नाशिक : येत्या आठवडाभरात ३२ जि.प. आणि ३३१ पंचायत समित्यांसाठी निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील ५० टक्क्यांपेक्षाही अधिक क्षेत्र जिल्हा परिषदेचे असल्याने राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता नाशिक महापालिका क्षेत्रातही लागू असणार आहे. त्यामुळे सिंहस्थकामांसह महापालिकेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या नागरी विकासाच्या कामांना फटका बसण्याची चिन्हे आहेत.
नाशिकमध्ये २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत असून, याची प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू आहे. सिंहस्थासाठी प्रशासकीय यंत्रणांना शासनाकडे २५ हजार कोटींचा आराखडा सादर केला आहे. सिंहस्थासाठी शासनाने प्राधिकरणाची स्थापना करत मनपा, सार्वजनिक बांधकामसह विविध विभागांच्या माध्यमातून ५,६५७ कोटींच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थितीत गुरुवारी (दि.१४) पार पडले.
अद्यापही महापालिका, सिंहस्थ प्राधिकरण आणि त्र्यंबकेश्वर नगरपालिकेची कामे मोठ्या प्रमाणावर मंजुरीविना प्रलंबित आहेत. त्यात जिल्हा परिषदेच्या आचारसंहितेचा फटका या कामांना बसण्याची शक्यता आहे. राज्यात एकाचवेळी ३२ जिल्हा परिषद आणि ३३१ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा आठवडाभरात होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या नियमानुसार संपूर्ण राज्यासाठी आचारसंहिता लागू होणार आहे. त्याचा मोठा फटका जिल्ह्याला बसणार आहे. मनपा, सिंहस्थ प्राधिकरण आणि त्र्यंबकेश्वर नगरपालिकेची कामे आचारसंहितेच्या कात्रीत अडकण्याची शक्यता आहे.
या कामांना बसणार फटका
सिंहस्थांतर्गत शहरात ९३० कोटींच्या रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया मनपाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली असली तरी या कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आलेले नाहीत. साडेसहा हजार कोटींचा रिंग रोड प्राधिकरणामार्फत केला जाणार असून, त्याचीही प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्याचे सहा पदरीकरण केले जाणार आहे. त्र्यंबकेश्वरमधील दर्शनपथ, शहरासाठी उपसा जलसिंचन योजना (३५० कोटी), शहरांतर्गत रस्ते (२५० कोटी) अशी विविध कामे अद्यापही अंमलबजावणीत आलेली नाहीत. त्यामुळे ही कामे आचारसंहितेच्या कात्रीत अडकण्याची शक्यता आहे.
प्राधिकरण घेणार आयोगाकडे धाव
त्र्यंबकेश्वर नगरपालिका निवडणुकीसाठी सध्या आचारसंहिता सुरू आहे. त्यात जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागल्यास सर्वाधिक मोठा फटका त्र्यंबकेश्वरमधील कामांना बसणार आहे. त्यामुळे सिंहस्थ प्राधिकरणाकडून नाशिक तसेच त्र्यंबकेश्वरमधील प्रलंबित कामांना मंजुरीसाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली जाणार आहे. कुंभमेळाजवळ असल्याने ही कामे आवश्यक आहे. त्यामुळे निवडणूक आचारसंहितेतून सिंहस्थ कामांना सूट देण्याचा प्रस्ताव कुंभमेळा प्राधिकरणाकडून निवडणूक आयोगाला सादर केला जाण्याची शक्यता आहे.