मनमाड (नाशिक) : शहर परिसरसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात गंभीर गुन्हे घडल्यानंतर फॉरेन्सिक टीम बोलवावी लागत होती. ही टीम येण्यासाठी खूप वेळ लागत होता. त्यामुळे अनेक गंभीर गुन्ह्यांचे पुरावे गोळा करण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. या सर्वांवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून दिल्या आहेत. मनमाड पोलिस उपविभागीय हद्दीसाठी ही मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे. नुकतीच ही व्हॅन उपलब्ध झाली असून मनमाड शहर पोलीस ठाण्यात या गाडीचा लोकार्पण सोहळा पार पडला.
पोलिस उपअधीक्षक बाजीराव महाजन, पोलिस निरीक्षक विजय करे यांनी व्हॅनची पूजा केली. सात वर्षे किंवा त्याहून अधिक कारावासाची शिक्षा होणारा गुन्हा घडल्यानंतर संबंधित गुन्ह्याचे घटनास्थळी न्यायवैद्यक पुरावा संकलित करण्यासाठी न्यायवैद्यक तज्ज्ञास नाशिक येथून बोलवावे लागत होते. त्यामुळे वेळेचा अपव्यय होत होता. न्यायवैद्यक पुरावे वेळेत संकलित करण्यास अडचणी निर्माण होत होत्या. भारतीय नागरिक सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी तसेच भौतिक, रासायनिक, जैविक व डिजिटल पुरावे गोळा करण्यााठी राज्यभरात २५९ मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन्स प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलिस अधीक्षक तेगबीरसिंग संधू यांनी मनमाड उपविभागासाठी अत्याधुनिक साधनसामग्रीसह मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून दिली आहे. या मोबाइल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये भौतिक, रासायनिक, जैविक व डिजिटल पुरावे गोळा करण्यासाठी कीट्स, रसायने व साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. व्हॅन उपलब्ध झाल्यामुळे मनमाड, नांदगाव, येवला, चांदवड व वडनेरभैरव या पोलिस ठाण्यामध्ये दाखल होणाऱ्या सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा होणाऱ्या गुन्ह्यांच्या तपासात विविध प्रकारचे पुरावे गोळा करण्यासाठी याची मदत होणार आहे. या मोबाइल फॉरेन्सिक व्हॅनमधील तज्ज्ञ अधिकारी मनमाड शहर पोलिस ठाण्यात उपलब्ध असतील.