नाशिक : मंत्री गिरीश महाजन यांना मनसे कार्यकर्त्यांनी घातलेला घेराव 
नाशिक

खड्ड्यांवरून मनसेचा कुंभमेळामंत्र्यांना घेराव

MNS pothole protest | खड्डेमुक्ती न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलनाचा थेट इशारा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : शहरातील रस्त्यांवरील जीवघेण्या खड्ड्यांच्या प्रश्नावर कुंभमेळामंत्री गिरीश महाजन महापालिकेत आढावा बैठक घेत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत महापालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन छेडले. आयुक्त मनीषा खत्री यांच्या कार्यालयाबाहेर झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासन आणि पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.

आंदोलनानंतर पदाधिकाऱ्यांनी थेट मंत्री गिरीश महाजन यांनाही घेराव घालत शहरातील खड्ड्यांबाबत जाब विचारला. नाशिक खड्डेमुक्त न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारादेखील मनसेच्या वतीने देण्यात आला. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विविध विकासकामांसह सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या महिनाभरात खड्यांमुळे झालेल्या अपघातांत पाच जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर - मनसेने शुक्रवारी (दि. ३१) आंदोलनाचा इशारा प्रत्यक्षात उतरवला.

महापालिका मनसेच्या मुख्यालयात आंदोलनकर्त्यांनी प्रशासन आणि सत्ताधारी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 'या पळपुट्या प्रशासनाचे करायचे काय?', 'फोडाफोडी करून मंत्री झालेत, खड्डे पाहून पळून गेलेत', 'नाशिक जिल्हा खड्ड्यांचा बालेकिल्ला', 'खड्यांचा हिशेब द्या,' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. पावसामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, नागरिकांचे जीव जात असतानाही प्रशासन निष्क्रिय असल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी आयुक्त कार्यालयासमोर तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर ठिय्या देत निषेध व्यक्त केला. मनसेच्या कार्यकाळात झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याची आठवण करून देत सध्याच्या कामकाजावरही त्यांनी टीका केली.

आंदोलनादरम्यान पोलिसांनी मध्यस्थी करत मंत्री गिरीश महाजन यांची मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत भेट घडवून आणली. बैठक संपल्यानंतर मनसेच्या शिष्टमंडळाने महाजन यांना घेराव घालत शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. अधिकारी टक्केवारीच्या राजकारणात व्यस्त असून, नागरिकांच्या सुरक्षेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, संदीप भवर, जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष ललित वाघ, शहराध्यक्ष तुषार जगताप, पंचवटी विभागाध्यक्ष विजय पडोळ, राहुल पाटील, शहर संघटक मेघराज नवले, अमित गांगुर्डे, किरण क्षीरसागर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागाणी

खड्यांमुळे झालेल्या अपघातांसाठी जबाबदार ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेने केली. तसेच शहरातील सर्व रस्ते तातडीने खड्डेमुक्त न केल्यास महापालिकेच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा थेट इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT