नरहरी झिरवाळ
पेसा उपोषणात विधानसभा उपाध्यक्ष तथा दिंडोरी विधानसभेचे आमदार नरहरी झिरवाळही सामील झाले. pudhari news network
नाशिक

Nashik News | पेसा भरती उपोषणात आमदार झिरवाळही सहभागी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : अनुससूचित क्षेत्रातील पेसा 17 संवर्गातील सुमारे साडेबारा हजार पदांची पदभरती तत्काळ करावी यासाठी आदिवासी 17 संवर्ग पेसा पदभरती कृती समितीतर्फे आदिवासी विकास विभागासमोर शुक्रवारपासून (दि.23) माजी आमदार जे.पी. गावित आमरण उपोषणास बसले आहेत. या उपोषणात विधानसभा उपाध्यक्ष तथा दिंडोरी विधानसभेचे आमदार नरहरी झिरवाळही सामील झाले.

सरळ सेवेतून भरल्या जाणार्‍या 17 संंवर्गापैकी काही संवर्गाच्या परिक्षा व निवड याद्या शासनाने जाहीर केल्या असून काही पदांची कागदपत्र पडताळणी समुदपदेशन झाले आहे. तर काही परीक्षा अजूनही घेणे प्रलंबित आहे. राज्यातील पेसा क्षेत्रातील सुमारे 17 संवर्गातील साडेबारा हजार पदे रिक्त आहे. तर सुमारे साडेआठ हजार आदिवासी उमेदवारांनी या पदांसाठी परीक्षा दिली आहे. मात्र अद्यापही पदे भरण्यात आलेली नाही. याबाबत शासनाला जाग आणून देण्यासाठी माजी आमदार जे.पी. गावितांसह आ. झिरवाळही उपोषणाला बसले आहेत.

शासन जोपर्यंत पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील पदभरती करीत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्रा जे.पी. गावित यांनी घेतला आहे. आंदोलनात सुमारे 350 पेक्षा अधिक आदिवासी उमेदवार सामील झाले आहेत.

25 आदिवासी आमदार उपोषणाला बसणार

पेसा भरतीबाबत मुख्यमंत्री अन दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी याअगोदर सकारात्मक चर्चा झाली असून अंतिम चर्चेद्वारे भरतीचा प्रश्न सोडविण्यात येईल. शासनावर दबाव आणण्याासाठी अनुसूचित क्षेत्रातील 25 आमदार देखील पुुढील 3 दिवसांत उपोषणस्थळी उपस्थित होतील, असे झिरवाळ यांनी सांगितले.

....तर आदिवासींचे भवितव्य धोक्यात : जे. पी. गावित

गेल्या अनेक वर्षांपासून पेसा भरतीप्रक्रिया रखडली आहे. यामुळे प्राथमिक विभागातील 4 शाळांना 1 शिक्षक, माध्यमिक विभागातील 4 शाळांना 2 शिक्षक अशी परिस्थिती आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले नाही तर आदिवासींचे भवितव्य धोक्यात येईल यासाठी ही भरती तत्काळ होणे गरजेचे असल्याचे परखड मत जे. पी. गावित यांनी मांडले.

SCROLL FOR NEXT