पुढारी ऑनलाइन डेस्क | राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्या पाठीमागे उभे राहत भक्कम साथ देणाऱ्या आमदरांपैकी अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील हेही एक होते. त्याचे फळ म्हणून पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक जिंकलेले असतानाही पाटील यांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या महायुतीच्या मंत्रिमंळात थेट मदत व पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री करण्यात आलं होतं. मात्र, याच अनिल पाटलांना देवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीच्या मंत्रिमंडळात डावलण्यात आलं. त्यामुळे अनिल पाटील व त्यांचे समर्थक नाराज होते. मात्र, अनिल पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी उशीरा का होईना अजित पवार गटाने प्रयत्न केला असून त्यांना पक्षात मोठी संघटनात्मक जबाबदारी दिली आहे.
आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी पाटील यांनी मंत्री असताना मिळालेली वाय प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था नाकारली होती. जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून आपल्याला सुरक्षा नको असल्याचे त्यांनी सांगितले होते. तेव्हा पासून ते नाराज असल्याचं स्पष्ट होतं. सध्या, जळगाव जिल्ह्यात महायुतीच्या ११ आमदारांपैकी एकमेव अमळनेरची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे आहे. अनिल पाटील यांचा मतदारसंघात चांगला दबदबा आहे, त्यांचा चाहता वर्गही मोठा आहे. त्यामुळे अनिल पाटील यांना फार काळ नाराज ठेवून चालणार नाही, हे लक्षात घेता त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पक्षाकडून अखेर झाला आहे.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांची प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्षपदावर नियुक्ती केली असून, त्याबरोबर उत्तर महाराष्ट्रातील जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्ह्यांच्या पक्ष संघटनेचे प्रभारी म्हणून त्यांच्याकडे वेगळी जबाबदारी असणार आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या महायुतीच्या मंत्रिमंडळात जळगाव जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे गुलाबराव पाटील, भाजपचे गिरीश महाजन व अजित पवार गटाचे अनिल पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश होता. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या महायुतीच्या मंत्रिमंळातही पुन्हा याच तिघांची वर्णी लागेल असे बोलले जात होते. मात्र, भाजपच्या धक्कातंत्रात अनिल पाटील यांना डावलून भाजपचे संजय सावकारे यांना संधी देण्यात आली. त्यानंतर, मंत्रीपद नाही किमान एखादे महामंडळ तरी मिळेल या आशेवर असलेल्या पाटील यांना त्यासाठीही विचारले गेले नाही.
2014 मध्ये अनिल पाटील यांनी भाजपच्या तिकीटावर अमळनेरमधून विधानसभेची निवडणूक लढली होती. मात्र, तेव्हा त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2019 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर अमळनेरमधून पुन्हा विधानसभेची निवडणूक लढली, ही निवडणूक ते जिंकले. जिल्ह्यातील पक्षाचे एकमेव आमदार असलेले पाटील यांचे महत्व त्यामुळे राष्ट्रवादीत वाढले होते. त्यांना मदत व पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्रीपदाची संधी मिळाली होती. याशिवाय नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही देण्यात आले होते.