Nashik News file photo
नाशिक

Six-Laning Project | द्वारका-दत्तमंदिर सहापनीकरणसाठी केंद्राला हवे जागेचे प्रमाणपत्र

Six-Laning Project | 45 मीटर रुंद अतिक्रमणमुक्त जागेची महापालिकेकडे मागितली हमी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थासाठी शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या द्वारका सर्कल ते दत्तमंदिर चौक रस्ता सहापनीकरणचा प्रकल्प आता जागेच्या उपलब्धतेच्या मुद्द्यावर आला आहे. सुमारे २२१.५२ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, कामाचा कार्यदेश देण्यापूर्वी किमान ९० टक्के रस्त्याच्या लांबीमध्ये ४५ मीटर रुंद अतिक्रमणमुक्त जागा उपलब्ध असल्याचा प्रमाणपत्र देण्याची मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने मनपा आयुक्तांकडे केली आहे.

मंत्रालयाच्या मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयाने यासंदर्भात पत्र पाठवले आहे. द्वारका सर्कल ते उपनगर नाका मार्गे दत्तमंदिर चौकापर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गावरील सुमारे ५.६५० किलोमीटर रस्ता सहापनीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय, रस्त्याच्या दोन्ही बाजूना दोनपदरी सेवा रस्ते उभारण्याचे नियोजन आहे. या कामासाठी केंद्राने २२१.५२ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता आणि तांत्रिक मंजुरी दिली आहे.

या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, व्ही. पी. सेठी कन्स्ट्रक्शन्स प्राइव्हेट लिमिटेड ही कंपनी सर्वात कमी दराची निविदाधर ठरली आहे. कंपनीने जीएसटी वगळून १७७.७४ कोटी रुपयांची निविदा सादर केली आहे. त्यामुळे कामाचा कार्यदेश देण्याची प्रक्रिया पुढे सरकली असली, तरी आवश्यक जागेच्या उपलब्धतेचे प्रमाणपत्र मननाकडून मिळणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सध्या या मार्गाची रुंदी ठिकठिकाणी २४ ते ३० मीटर आहे. प्रस्तावित सहापनीकरण आणि सेवा रस्त्यांसाठी ४५ मीटर रुंदीची जागा आवश्यक आहे. महापालिकेच्या मंजूर विकास आराखदानुसार ही जागा उपलब्ध करून देण्याबाबत यापूर्वी आश्वासन देण्यात आले होते.

मात्र, प्रकल्पाच्या आवश्यकतानुसार अतिरिक्त १५ ते २० मीटर रुंदीची जागा उपलब्ध करून देण्याचा मुद्दा पुढे आला आहे. त्यासाठी विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) पद्धतीचा पर्याय चर्चेत आहे. मंत्रालयाच्या तांत्रिक मंजुरीतील अटींनुसार, कामाचा कार्यदेश देण्यापूर्वी आवश्यक जागेची उपलब्धता निश्चित करणे गरजेचे आहे.

सिंहस्थापूर्वी काम पूर्ण करण्याचे आव्हान

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ लक्षात घेता, या रस्त्याचे रुंदीकरण वेळेत पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. प्रकल्पाच्या कामाला विलंब झाल्यास, त्याचा परिणाम सिंहस्थ काळातील वाहतूक नियोजनावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागेच्या उपलब्धतेबाबतचे प्रमाणपत्र तातडीने देण्याची विनंती मंत्रालयाने केली आहे.

द्वारका सर्कल ते दत्तमंदिर चौक हा शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग आहे. या रस्त्याचे सहापनीकरण आणि सेवा रस्त्यांची उभारणी झाल्यास, वाहतुकीची क्षमता वाढण्यास मदत होऊ शकते. मात्र, प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार, याचे उत्तर आता महापालिकेच्या प्रमाणपत्रावर आणि नंतरच्या कार्यदेश प्रक्रियेवर अवलंबून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT