Narhari Zirwal Pudhari
नाशिक

Drugs Lobby FDA Maharashtra 2026 | तुकाराम मुंढेंची बदली होणार नाही !

Drugs Lobby FDA Maharashtra 2026 | 250 कोटींच्या 'कथित' लॉबीच्या चर्चेवर मंत्री नरहरी झिरवाळ यांचे मोठे वक्तव्य

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

धडाकेबाज असलेले अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर मुंढे यांच्या पथकाने अनेक ठिकाणी धाड टाकत भेसळयुक्त पदार्थ जप्त करत संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई केली आहे.

मुंढे या विभागात आल्यापासून ड्रग्ज माफियांचे धाबे दणाणले आहे. यातच आता मुंढे यांच्या बदलीची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, एफडीएकडून सध्या अतिशय चांगली कारवाई सुरू आहे, त्यामुळे मुंढे यांच्या बदलीचा प्रश्नच येत नाही, असे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणात एक गंभीर आरोप केला होता. ड्रग्ज लॉबी आणि मेडिकल कंपन्या एकत्र येऊन मुंढे यांच्या मागे लागल्या असून, त्यांच्या बदलीसाठी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज लॉबीकडून तब्बल २५० कोटी रुपये गोळा करण्यात आले आहेत. पुढील आठवड्यात या संपूर्ण प्रकरणाचा नावानिशी पर्दाफाश करणार असल्याचा इशाराही आव्हाड यांनी दिला होता.

या संपूर्ण प्रकरणावर बोलताना मंत्री झिरवाळ यांनी एफडीएकडून चांगली कारवाई सध्या सुरू आहे, त्यामुळे मुंढे यांच्या बदलीचा प्रश्नच येत नाही. अधिकाऱ्यांना गाड्या नाहीत, कार्यालय नाहीत. अत्यंत दयनीय अवस्था आहे. गाड्यांची व्यवस्था केली जाईल, अशी माहिती दिली.

तर, दुसरीकडे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणावर भाष्य करताना सांगितले की, तुकाराम मुंढे यांच्यातील टी (तुकाराम) हा टायगरमधील टी झाला आहे. ते चांगले काम करतायत, त्यांना तीन वर्षे पदावर ठेवले पाहिजे. तर अर्जुन खोतकर यांनी मुंढे यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT