नाशिक : आदिवासी योजनांमुळे आदिवासींचे अर्थार्जन उत्तम होत असून, त्यांच्या विकासासाठी शासनस्तरावर नियमित प्रयत्न होत आहेत. नाशिकमधील कातकरी बांधवांनी बनविलेल्या नागलीच्या पदार्थांचा आस्वाद घेताना केंद्रीय जनजाती मंत्री जुएल ओराम (Jual Oram Minister of Tribal Affairs of India) यांनी आदिवासींचे कौतुक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झारखंडमधील हजारीबाग येथे धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी केंद्रीय जनजाती मंत्री जुएल ओराम, केंद्रीय जनजाती मंत्रालय सचिव विभू नायर, सहसचिव नवलजित कपूर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाला शबरी आदिवासी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी व्यवसाय सल्लागार मनोहर मोहिते, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विस्तार अधिकारी संदीप चंदनशिवे, कपिलधारा वनधन विकास केंद्र अध्यक्ष गोकुळ हिलम, लाभार्थी भाऊसाहेब रन, पांडुरंग रन आदी उपस्थित होते. यावेळी शेतकरी उत्पादक कंपन्या व वनधन केंद्रातील बनविलेल्या शबरी नॅचरल्स उत्पादनांची उत्पादन बास्केट केंद्रीय जनजाती मंत्री जेऊल यांना भेट देण्यात आली.
शबरी नॅचरल्स ब्रॅण्डमुळे आदिवासींचे अर्थार्जन वाढणाार असून, जगण्याचा स्तर नक्कीच सुधारेल. योजनांच्या सकारात्मक अंमलबजावणीमुळे देशभरातील जनजाती आपले अर्थार्जन करून आनंदाने जीवन जगतील, असा आशावाद मंत्री जुएल यांनी व्यक्त केला. शबरी महामंडळाचे मोहिते यांनी कातकरी समाजाचे स्थलांतर रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या अभियानाची तसेच शबरी नॅचरल ब्रँड कसा विकसित झाला याची विस्तृत माहिती दिली.
मंत्री जुएल ओराम यांना भेट देण्यात आलेल्या उत्पादनांमध्ये शबरी नॅचरलच्या बारा उत्पादनांचा समावेश होता. लाकडांपासून बनविलेल्या दिव्यांच्या माळा, महुआ सिरप, महुआ लाडू, महुआ तेल, महुआ मनुके, रागी बिस्किटे, काजू, मध, तांदूळ, वरई आणि रागी सत्त्व या उत्पादनांचा समावेश आहे.