नाशिकरोड; पुढारी वृत्तसेवा: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शिर्डी लोकसभा मतदार संघातील इच्छुक तसेच माजी मंत्री बबनराव घोलप यांनी आपल्या शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा मातोश्रीवर पाठविला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघातून ते निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. पक्षाने उमेदवारी देण्यास नकार दिल्याने त्यांनी राजीनामा दिला. दरम्यान, त्यांच्या राजीनाम्याची दखल वरिष्ठ नेत्यांनी घेतली असून सोमवारी घोलप यांना मातोश्रीवर चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. त्यानंतर घोलप आपल्या राजीनाम्याचा निर्णय घेणार आहे. Babanrao Gholap
मागील काही दिवसांपासून माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात लक्ष घातले आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत ते शिर्डी मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र, त्यावेळी त्यांना डावलण्यात आले. उमेदवारी न दिल्याने खचून न जाता सलग पाच वर्ष शिर्डी मतदारसंघात त्यांनी उत्तम जनसंपर्क ठेवला आहे. ते शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख देखील होते. त्यामुळे त्यांनी मतदारसंघातील गावोगावी फिरून आपले नाव लोकसभेसाठी पुढे केले होते. मात्र, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून शिर्डीतून आपली दावेदारी दाखल केली. त्यामुळे घोलप नाराज झाले आहेत.Babanrao Gholap
याबाबत त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे पक्षाने घोलप यांची शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या संपर्कप्रमुख पदावरून उचलबांगडी करून आमदार सुनील शिंदे यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे घोलप यांच्या नाराजीत भर पडली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या समर्थकांनी घोलप यांनी उपनेता पदाचा राजीनामा देण्यासाठी गळ घातली होती. त्यांच्या दाबावामुळे घोलप यांनी उपनेता पदाच्या राजीनाम्याचे सुतोवाच केले आहे.
दरम्यान घोलप हे सुरुवातीपासून शिवसेनेसोबत एकनिष्ठ आहे. त्यांनी यापूर्वी देवळाली विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवून विजय संपादित केला आहे. १९९५ मधील युतीच्या सरकारमध्ये ते समाजकल्याण मंत्री होते. अण्णा हजारे यांनी घोलप यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने त्यांना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पुढे त्यांचे पुत्र योगेश घोलप हे देवळाली मतदार संघाचे आमदार होते. २०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या सरोज आहेर यांनी त्यांचा पराभव केला होता.
सोमवारी बबनराव घोलप यांना चर्चेसाठी मातोश्रीवर बोलविले आहे. मातोश्रीवर काय चर्चा होते, शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळवण्यासाठी ठोस आश्वासन मिळते की नाही ?, यावर बबनराव घोलप आपली पुढील राजकीय दिशा ठरविणार आहेत. ठोस आश्वासन मिळाले नाही तर घोलप शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुख पदावर अचानक आमदार सुनील शिंदे यांची नियुक्ती केली. याबाबत मला विश्वासात घेतले गेले नाही. मागील काही दिवसांपासून मी शिर्डी मतदारसंघात संपर्क ठेवून आहे. मला विश्वासात न घेतल्यामुळे मी नाराज असून त्यामुळे शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा मातोश्रीवर पाठविला आहे.
माजी मंत्री बबनराव घोलप यांचे पुत्र योगेश घोलप देखील नाराज आहेत. वडिलांना शिर्डी लोकसभा मतदारसंघात डावलेले गेल्यामुळे ते देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करू शकतात. वडील बबनराव घोलप यांची नाराजी दूर होते की नाही, यावर माजी आमदार योगेश घोलप यांची पुढील भूमिका ठरणार आहे.
हेही वाचा