नाशिक : कधी काळी घरासमोर मांडव टाकून अथवा मंदिरात साग्रसंगीत विधीसह आणि मोजक्याच आर्थिक बजेटमध्ये होणारा विवाहसोहळा आज मोठा 'इव्हेंट' झाला आहे. अगदी 'एंगेजमेंट'पासून ते विवाहपश्चात हनिमूनसाठी 'प्लाइट'सह नियोजन करून देणाऱ्या 'इव्हेंट' कंपन्यांकडे काम सोपवून विवाह आनंदात आणि विनाटेंशन 'एन्जॉय' करण्याचा 'ट्रेंड' सध्या दिसून येत आहे.
विवाह हा भारतीय संस्कृतीत सर्वात सुंदर, पवित्र संस्कार आहे. विवाह संस्था आणि तिच्यामधील पारंपरिक विधीला जगभरात मूल्याधिष्ठित मजबूत संस्कार म्हणून ओळखले जाते. आपल्या जीवनसाथीशी जन्मांतरांच्या गाठी बांधणारा विवाहही तितकाच अविस्मरणीय आणि धूमधडाक्यात व्हावा, अशी आजच्या युवा पिढीची मानसिकता आहे. संगणक, आयटीसारख्या नोकऱ्यांमुळे वाढलेले 'सॅलरी पॅकेज', क्रयशक्ती, वाढलेली व्यवधाने, व्यग्रता यामुळे तरुणाईकडे असलेला अत्यल्प वेळ आणि पालकांमध्येही मुलांचे विवाह धूमधडक्यातच व्हावे, ही बदललेली मानसिकता यामुळे विवाहाचे रूप बदलले आहे. कौटुंबिक सोहळा असे असलेले स्वरूप आज एक महा'इव्हेंट' झाला आहे.
पूर्वी कुटुंबातील नातेवाईक विवाहात काम करून ते पार पाडत असत. आज लोकांकडे विवाहात काम करण्याची मानसिकताही कमी झाली आहे. हीच गरज ओळखून साखरपूड्यापासून ते विवाह आणि त्यानंतरच्या सर्वच विधी, कार्यक्रमांसाठी एकत्रित सेवा-सुविधा देणाऱे 'पॅकेज' देणाऱ्या 'इव्हेंट' संस्थांचा 'ट्रेंड' सध्या दिसत आहे.
पूर्वी विवाहासाठी घरातील सर्वच लोक काम करत. आता पूर्वीसारखे लग्नात काम केले जात नाही. कारण सर्वांनाच विवाहात 'एन्जॉय' करायचा असतो. वाढलेले उत्पन्न आणि विवाह संस्मरणीय करण्यासाठी आणि तणावरहित लग्न आनंदाने 'एन्जॉय' करण्याची मानसिकता वाढत आहे. त्यामुळे आम्ही 'अथ'पासून 'इति'पर्यंत सर्व कार्यक्रमाचे पॅकेज देतो.गणेश अशोक वाघ, इव्हेंट मॅनेजर, नाशिक.
विवाह एकदा होत असतो. त्यामुळे तो संस्मरणीय व्हावा असे सर्वांनाच वाटते. हल्लीची पिढी विवाहाकडे सोहळा म्हणून तसेच 'ग्रॅण्ड' इव्हेंट म्हणूनही पाहते. वाढलेली क्रयशक्ती, कमी झालेला वेळ यामुळे साखरपुड्यापासून ते विवाहानंतर फिरायला जाण्यापर्यंत सर्वच गोष्टींचे नियोजित पॅकेज देण्याकडे कल वाढत आहे.सिद्धार्थ चांदवडकर, आयटी अभियंता, नाशिक.