लासलगाव ( नाशिक ) : दसरा-दिवाळीच्या सणासाठी मागणी असणाऱ्या झेंडू फुलांना यंदा बाजारात अपेक्षित दर मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी फिकी पडली आहे. लासलगाव परिसरात झेंडू फुलांना सध्या केवळ 20 ते 22 रुपये किलो इतकाच दर मिळत असून, उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
लासलगावजवळील टाकळी (विंचूर) येथील शेतकरी भागीरथ पर्वत शिंदे यांनी गेल्या दोन वर्षांपासून कांद्याला भाव न मिळाल्याने पर्याय म्हणून झेंडू शेतीचा प्रयोग केला. त्यांनी सुमारे ३० हजार रुपयांचा खर्च करून १५ गुंठे क्षेत्रात पिवळ्या आणि केशरी रंगाच्या झेंडू फुलांची लागवड केली होती. दसऱ्याच्या सणात झेंडूला १५ ते २० रुपये किलो दर मिळाला. मात्र दिवाळीच्या काळात हा दर वाढून ५० ते ६० रुपये किलो मिळेल, अशी अपेक्षा होती.
परंतु बाजारात मागणीपेक्षा उत्पादन अधिक झाल्याने दर कोसळले. सध्या व्यापारी फक्त २० ते २२ रुपये किलो भाव देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मजुरी, खतं, पाणी आणि वाहतूक खर्चही परवडत नाही. “मेहनत, खर्च आणि अपेक्षा सर्व व्यर्थ गेल्याची भावना आहे,” असे शिंदे यांनी सांगितले.
कांद्याच्या संकटातून मार्ग काढण्यासाठी पर्यायी पिकाचा प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना झेंडू बाजारातील दरघसरणीने पुन्हा निराशेचा धक्का बसला आहे. सणासुदीच्या हंगामातही शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, अशी मागणी स्थानिक शेतकरी करत आहेत.