नाशिकरोड : जय भवानी रोड परिसरात मराठी कुटुंबावर दादागिरी करताना, तुम मराठी लोग औकात में रहो असे सुनावणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीला मनसे पदाधिकाऱ्यांनी चोप देत मराठी कुटुंबाची माफी मागण्यास भाग पाडले.
बी. एन. पंडित ही परप्रांतीय व्यक्ती कार शिकत असताना देवी उद्धव लासुरे या मराठी कुटुंबाच्या दुचाकीला कारची धडक बसली आणि दुचाकीचे नुकसान झाले. लासुरे यांनी जाब विचारल्यानंतर पंडीत याने लासुरे कुटुंबाला शिवीगाळ केली. “तुम मराठी लोग औकात में रहो, तुम्हारी गाडी और घर भंगार है” अशी अवमानकारक वक्तव्येही केली. या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष ॲड. नितीन पंडित, आदित्य कुलकर्णी व पदाधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सुरुवातीला पंडितला समजावण्याचा प्रयत्न केला असता, त्याने उर्मटपणे उत्तर देत, “मला मराठी येत नाही, मी फक्त हिंदीत बोलेन” असे सांगितले. या उर्मट वर्तनामुळे संतप्त मनसे पदाधिकाऱ्यांनी पंडितला चोप देत मराठी कुटुंबाची माफी मागण्यास भाग पाडले. उपनगर पोलिस ठाण्यात पंडितविरोधात धमकावण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.