Marathi Vishwakosh  
नाशिक

Marathi Vishwakosh Knowledge Boards Expansion | मराठी विश्वकोशाच्या ज्ञानकक्षा रुंदावणार !

६१ हून अधिक विस्तारित ज्ञानमंडळांची होणार स्थापना

पुढारी वृत्तसेवा

विद्यापीठे, संशोधन संस्थांच्या सहकार्याने विषयवार तज्ज्ञांची फळी उभारणार.

लेखक, समीक्षक, भाषांतरकारांसाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधा.

विश्वकोश निर्मिती प्रक्रियेत आता सर्वसामान्यांनाही सहभागाची संधी

आसिफ सय्यद - मराठी भाषेतील ज्ञाननिर्मितीला चालना देण्याबरोबरच मराठी विश्वकोशाचे अद्ययावतीकरण आणि विविध कोशवाङ्गय प्रकल्पांची निर्मिती अधिक व्यापक करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या विविध प्रकल्पांसाठी ६१ हून अधिक विस्तारित ज्ञानमंडळांची स्थापना करण्यात येणार आहे. या ज्ञानमंडळांच्या माध्यमातून विद्यापीठे, संशोधन संस्था आणि विविध विषयांतील तज्ज्ञांचा सहभाग घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे, लेखक, समीक्षक, समन्वयक, भाषांतरकार, मुद्रितशोधक आणि अभ्यागत संपादक म्हणून काम करण्यास इच्छुक व्यक्तींना ऑनलाइन नोंदणीद्वारे सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मराठी विश्वकोशाच्या निर्मितीबरोबरच त्याचे अद्ययावतीकरण, कुमार विश्वकोश, बालविश्वकोश आणि ऑलिम्पिक विश्वकोश अशा विविध प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय मराठी भाषा विभागाने घेतला आहे. या माध्यमातून ज्ञानमंडळांची रचना मानव्यविद्या तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा व्यापक विभागांमध्ये करण्यात येणार आहे. भाषा-साहित्य, इतिहास, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, कायदा, क्रीडा, चित्रपट, पर्यटन, भूगोल, शिक्षण, समाजशास्त्र आदी विषयांसाठी स्वतंत्र ज्ञानमंडळे असतील. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात अवकाश, वैद्यकशास्त्र, कृषी, खगोलशास्त्र, गणित, जीवशास्त्र, पर्यावरण, प्रदूषण नियंत्रण, माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि रसायनशास्त्र अशा विषयांचा समावेश करण्यात येणार आहे.

बाल, कुमार अन् ऑलिम्पिक विश्वकोशानांही चालना

मराठी विश्वकोशाच्या २३ खंडांच्या योजनेपैकी १ ते २० संहिता खंड आणि २१ वा सूचीखंड असे एकूण २१ खंड प्रकाशित झाले आहेत. २२ वा परिभाषा खंड अद्ययावत करणे आणि २३ वा नकाशा खंड प्रकाशित करण्याचे काम प्रस्तावित आहे. आतापर्यंत विश्वकोशात १८ हजारांहून अधिक नोंदींचा समावेश झाला असून, बदलत्या काळानुसार त्यांचे अद्ययावतीकरण करण्याची आवश्यकता आहे. कुमार विश्वकोशाच्या माध्यमातून साधारणतः १४ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना विज्ञान, इतिहास, भूगोल, साहित्य, कला, कृषी आणि क्रीडा अशा विषयांची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बालविश्वकोश हा साधारणतः ६ ते १३ वयोगटातील मुलांसाठी सोप्या भाषेत तयार केला जाणार आहे. ऑलिम्पिक विश्वकोशात ऑलिम्पिकचा इतिहास, पदकविजेते खेळाडू, भारतीय व महाराष्ट्रीय खेळाडू, ऑलिम्पिक समिती, नियम आणि जागतिक ऑलिम्पिक चळवळीची माहिती समाविष्ट केली जाणार आहे.

नोंदनिर्मितीची टप्प्याटप्प्याने प्रक्रिया

विश्वकोशातील नॉर्दीच्या निर्मितीसाठी विषयांची निवड, नोंदयादी तयार करणे, लेखकांकडून लेखन करून घेणे, आवश्यकतेनुसार भाषांतर, समीक्षण, मुद्रितशोधन तसेच चित्रे, नकाशे आणि आकृत्यांचा समावेश अशा टप्प्यांतून प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तयार झालेल्या नोंदींची संपादकीय तपासणी झाल्यानंतर अंतिम प्रकाशनाचा निर्णय घेतला जाईल. नोंदींचे अंतिम प्रकाशन करण्याचे अधिकार विश्वकोश निर्मिती मंडळाच्या प्रमुख संपादक तथा अध्यक्षांकडे राहणार आहेत.

ऑनलाइन नोंदणी करता येणार !

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक व्यक्तींना ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. लेखक, समीक्षक, समन्वयक, भाषांतरकार, मुद्रितशोधक आणि अभ्यागत संपादक अशा विविध भूमिकांसाठी नोंदणीची सुविधा असेल. या प्रक्रियेसाठी वय, शिक्षण, लिंग, जात, धर्म किंवा प्रदेश यांची अट ठेवण्यात आलेली नाही. मात्र, ऑनलाइन नोंदणी केली म्हणजे संबंधित व्यक्तीची निवड निश्चित झाली, असे समजता येणार नाही. प्राप्त अर्जाची छाननी आणि आवश्यकतेनुसार मुलाखत घेऊन विषयातील पात्रता व अनुभवाच्या आधारे निवड केली जाणार आहे. या कामासाठी निवड झाल्याने कायमस्वरूपी शासकीय नोकरीचा हक्क निर्माण होणार नाही, असेही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT