Jarange Patil . Pudhari File photo
नाशिक

Manoj Jarange Patil | ‘राजकारणाचा असा मसाला झाला की कोणाचा प्रचार करावा तेच कळत नाही’; मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil | कोण कोणत्या पक्षात आहे, याचा मेळच लागत नाही. असा मसाला झाला की, कोणाचा प्रचार करावा हे समजत नाही.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कोण कोणत्या पक्षात आहे, याचा मेळच लागत नाही. असा मसाला झाला की, कोणाचा प्रचार करावा हे समजत नाही. कोणाची कोणाशी युती हे सांगणे अवघड आहे. विरोधक नेमके आपण आहोत की दुसरे, हेही समजत नाही. यात जर गोरगरिबांचा वापर होत असेल, तर आपण सर्वांनी हुशार होणे गरजेचे आहे,

अशा शब्दांत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर खोचक टीका केली. सातपूर विभागातील छत्रपती शिवाजीनगर येथील श्रीकृष्ण मंदिर येथे छावा क्रांतिवीर सेनेच्या १२ व्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज यांच्या पत्नी डॉ. आयुषी देशमुख, कामगार नेते अभिजित राणे, भारत क्रांती मिशनचे संस्थापक अध्यक्ष विलास पांगारकर, माजी महापौर दशरथ पाटील, छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर उपस्थित होते. जरांगे पाटील म्हणाले की, मी राजकारणात कमी हस्तक्षेप करतो. मात्र, केला तर कार्यक्रम करूनच सोडतो.

मी विधानसभा तसेच जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुकीच्या मैदानात पडणार नसल्याचे सुरुवातीला स्पष्ट केले होते. मात्र, गेल्या लोकसभा निवडणुकीत जेव्हा मैदानात उतरलो, तेव्हा रपारप ऐकाकाला पाडले. मी एखाद्याला पाडायचे ठरवले, तर त्याला पाडल्याशिवाय स्वस्थ बसत नसल्याचेही ते म्हणाले. मी जातीयवाद करत नाही. समाजाला आरक्षण मागतो. यात कुठे जातीयवाद आला, असेही जरांगे-पाटील म्हणाले.

'माझीच फिरकी घेतली...'

मला निमंत्रण देताना वर्धापन दिनाचा सोहळा असल्याचे सांगितले गेले. मात्र, येथे आल्यावर माझी फिरकी घेतल्याचे मला समजले. जिकडे बघावे, तिकडे बाणच दिसतात. त्यामुळे मी फुल्ल लोडमध्ये आलो आहे, असे जरांगे-पाटील यांनी म्हणताच एकच हशा पिकला. तुमच्यासाठी मी केव्हाही पुढे येण्यास तयार असल्याचेही जरांगे-पाटील म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT