फडणवीस, भुजबळांना अस्मान दाखविणार  File Photo
नाशिक

Manoj Jarange-Patil | फडणवीस, भुजबळांना आस्मान दाखविणार

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : मराठा समाजाने एकजूट दाखविल्याने, सर्व जातींच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सर्वांनाच असे वाटत आहे की, गोरगरिबांची आणि शेतकऱ्यांची सत्ता येऊ शकतेय. गोरगरिबांना न्याय मिळू शकतो. त्यामुळे माझी मराठा समाजाला हात जोडून विनंती आहे की, जर आपल्याला आरक्षण दिले नाही तर देणारे बनावे लागेल, अशा शब्दांत मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी एल्गार पुकारला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर शरसंधान साधताना, आगामी विधानसभेत तुम्हाला आसमान दाखवू, असा इशाराही दिला.

नाशिक : आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या शांतता रॅलीत सहभागी मराठा समाज बांधव

पश्चिम महाराष्ट्र शांतता रॅलीचा मंगळवारी (दि.१३) नाशिकमध्ये समारोप झाला. यावेळी सीबीएस चौकात झालेल्या जाहीर सभेत त्यांनी, आगामी विधानसभा निवडणुकीचे एकप्रकारे रणशिंग फुंकताना सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना गर्भित इशाराही दिला. आपल्या भाषणाच्या सुरुवातीपासूनच त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री भुजबळ यांचा समाचार घेतला. तसेच मराठा समाजाला एकजूट राहण्याचे आवाहनही केले. आतापर्यंत तुम्ही नेते आणि पक्षांना मोठे केले. मात्र, आता जात अन् लेकरांना मोठे करा. शेतकरी, मुस्लीम, दलित, बारा बलुतेदार, ओबीसींना गोरगरिबांची पोरच न्याय मिळवून देऊ शकतात. हे सर्व एकत्र भिडल्यास त्यांचा कार्यक्रम झालाच म्हणून समजा, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. पक्ष अन् नेत्यांनी गेली ४५ वर्षे समाजाची फसवणूक केली. आताही तेच केले जात आहे. जे आरक्षण मागितले नाही, ते न टिकणारे दहा टक्के आरक्षण लादले. वरून हे आरक्षण माझ्यामुळेच गेल्याचा कांगावा केला जात आहे. उलट त्यांनी दोन महिन्यांचा वेळ मागितला होता. त्यानुसार १३ जून ते १३ ऑगस्ट अशा दोन महिन्यांचा वेळ दिला. मात्र, या सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही. भाजपमधील लोकांना आरक्षण मिळू द्यायचे नाही. नेमका यांचा डाव काय आहे, समजायला तयार नाही. आता बैठकांचा नवा डाव आणला आहे. तो म्हणतो मी जात नाही, हा म्हणतो मी जात नाही. मात्र, त्यात मरण मराठ्यांचेच होत असल्याचेही जरांगे म्हणाले.

मागील एक वर्षापासून आरक्षण मागत आहे. इतक्या ताकदीने आंदोलन केले. कुठेही जा मराठा लाखात आहेत. एवढे असताना फडणवीस मला उघडे पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी काय चूक केली. मी माझ्या समाजाला आरक्षण मागत आहे. इतर समाजाला आरक्षण दिले, तेव्हा मराठ्यांनी विरोध केला नाही. तुमची लेकरं मोठी झाली तेव्हा आम्ही काही बोललो नाही. पण मराठा आरक्षणासाठी तुम्ही सर्व जण विरोध करीत आहेत. हीच काय तुमची नियत? मराठ्यांनी चांगल्या चांगल्यांना पाणी पाजले आहे. तुम्हाला पाणी पाजायला वेळ लागणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. मराठा समाजाला आरक्षण मागितले तर माझ्याविरोधात एसआयटी लावली. आमच्या छाताडावर गोळ्या झाडल्या. आई-बहिणींना रक्ताच्या थारोळ्यात पाडले. मुलांवर केसेस केल्या. छगन भुजबळांचे ऐकून कितीही त्रास दिला, तरी फडणवीसांना पुरून उरण्यात आम्ही कमी पडणार नाही. तुम्ही आमच्या नादाला लागू नका, अन्यथा मुळासकट तुमचे उमेदवार उघडून टाकू. मला राजकारणात जायचे नाही, तुम्ही आरक्षण द्या, अन्यथा आम्हाला आरक्षण देणारे बनावे लागेल, असा इशाराही त्यांनी याप्रसंगी दिला. दरम्यान, यावेळी नाशिक जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाडायचे की लढायचे २९ ला निर्णय

आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचे उमेदवार पाडायचे की विधानसभा लढायची याबाबतचा निर्णय २९ ऑगस्टला आंतरवली सराटी येथे घेण्यात येणार आहे. त्यासाठी नाशिकमधून मोठ्या संख्येने मराठ्यांनी आंतरवली येथे उपस्थित राहावे. याठिकाणी सर्वांच्या सहमतीने निर्णय घेतला जाईल, असे जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच आगामी विधानसभा निवडणूक लढण्यास समाजातील इच्छुकांनी १४ ते २० ऑगस्टदरम्यान आपल्या कामांचा अहवाल सादर करावा, असेही आवाहनही त्यांनी यावेळी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT