मनोज जरांगे- पाटील यांच्या शांतता रॅलीसाठी जय्यत तयारी pudhari photo
नाशिक

Manoj Jarange Nashik | मनोज जरांगे- पाटील यांची आज नाशिकमध्ये रॅली

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : मराठायोद्धा मनोज जरांगे-पाटील यांची शांतता रॅली मंगळवारी (दि.१३) नाशिकमध्ये दाखल होत आहे. तपाेवन ते सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अशी रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून, यात हजारो मराठा बांधव सहभागी होणार आहेत. सीबीएस मुख्य चौकात उभारलेल्या स्टेजवरून जरांगे-पाटील मार्गदर्शन करणार आहेत. मंत्री छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात जरांगे-पाटील यांची तोफ धडाडणार असल्याने रॅलीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

मराठा आरक्षणासाठी जरांगे यांनी शांतता रॅली काढली आहे. नगरमार्गे ही रॅली नाशिकमध्ये दाखल होत आहे. सकाळी ११ वाजता तपोवन येथून रॅलीला प्रारंभ होईल. रॅली जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे पोहोचेल. त्यानंतर सीबीएस चौकात जरांगे यांची जाहीर सभा होईल. यानिमित्ताने शहर-परिसर भगवेमय झाले आहे. कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वत: रॅलीचा मार्ग व सभास्थळाची पाहणी केली. याप्रसंगी उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त पद्मजा बढे, मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक करण गायकर, नाना बच्छाव, विलास जाधव, कैलास खांडबहाले, नानासाहेब वाघ, योगेश कापसे, राम निकम, एकता खैरे, रेखा जाधव, स्वप्ना राऊत आदी उपस्थित होते. दरम्यान जरांगे वावी, सिन्नर, नाशिकरोडमार्गे शहरात दाखल होतील. त्यापुढे जेल रोड, नांदूरनाका, छत्रपती संभाजीनगर रोडमार्गे तपोवन येथे आगमन होईल. सकाळी ११ वाजता तेथून शांतता रॅलीला सुरुवात होईल. तेथून नवीन आडगाव नाका, निमाणी, पंचवटी कारंजामार्गे मालेगाव स्टॅन्ड येथे रॅली पोहोचेल. तेथे जरांगे-पाटील यांचे स्वागत केले जाणार आहे.

वाहनतळाची सुविधा

रॅलीसाठी छत्रपती संभाजीनगरकडून येणाऱ्या वाहनांना पंचवटीतील नीलगिरी बाग, दिंडोरीकडून येणाऱ्या वाहनांसाठी शरदचंद्र पवार बाजार समिती येथे वाहनतळ असेल. घोटी व इगतपुरीकडून येणाऱ्या वाहनांसाठी महामार्ग बसस्थानकाशेजारील मोकळ्या जागा व डोंगरे मैदान आदी ठिकाणी वाहनतळ करण्यात आले आहेत.

शहरातील शाळांना सुटी

रॅलीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिका हद्दीतील प्राथमिक व माध्यमिक शाळांना मंगळवारी (दि.१३) जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या आदेशान्वे मनपा शिक्षण विभागाने सुटी जाहीर करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या काही वाहतूकदारांनी यापूर्वीच पालकांना मंगळवारी येणार नसल्याचे सूचित केले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT