Railway Route Pudhari
नाशिक

Manmad Indore Railway Project | मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी घरे, जमीन मोजमाप सुरु

Manmad Indore Railway Project | महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील जनतेसाठी महत्त्वपूर्ण असलेला मात्र काही वर्षांपासून रखडलेल्या मनमाड-इंद रेल्वेमार्गासाठी रेल्वे प्रशासनाने जमीन अधिग्रहण प्रक्रिया केली सुरू केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

मनमाड : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील जनतेसाठी महत्त्वपूर्ण असलेला मात्र काही वर्षांपासून रखडलेल्या मनमाड-इंद रेल्वेमार्गासाठी रेल्वे प्रशासनाने जमीन अधिग्रहण प्रक्रिया केली सुरू केली आहे. गर्डर शॉप भागात रेल्वेमार्गालगतच्या वसाहतीत भूमिलेखा विभागाने राहते घर आणि मोकळ्या जागेचे मोजमाप सुरू केले.

रेल्वेमार्गासाठी ज्यांचे घर, जमिनी जाणार असलेल्यांनी यापूर्वी तीव्र विरोध करून दोनदा मोजमाप करू दिले नव्हते. त्यामुळे आज कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे कोणीही विरोध केला नाही.

केंद्र आणि रेल्वे मंत्रालयाने मनमाड-धुळे-नरडाणा डॉ. आंबेडकरनगर दरम्यान ३०९.४३ किमी लांबीच्या नवीन रेल्वेमार्गाला मंजुरी दिल्यानंतर अत्यंत संथगतीने या मार्गाचे काम सुरू होते. आता कामाला गती देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने भूसंपादनाचे काम हाती घेतले आहे.

या अंतर्गत शहरातील गर्डर शॉप भागात सुमारे २०० घरांची वसाहत रेल्वे लाइनजवळ आहे. त्यातून सुमारे ७५ पेक्षा घरे अधिग्रहित करावी लागणार आहेत. मात्र मोबदल्याबाबत कल्पना दिली नसल्याने घरमालकांनी मोजमापाला विरोध केला होता. त्यामुळे सोमवारी (दि. २३) कडक पोलिस बंदोबस्तात शासनाच्या वेगवेगळ्या विभागांतील पथकाच्या अधिकाऱ्यांनी घर आणि जमीन मोजण्यास सुरुवात केली.

या पथकात भूमिअभिलेखा, महसूल, सार्वजनिक बांधकाम, नगर परिषद, वन, कृषी आदी विभागांचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले. रेल्वेमार्गाचा फायदा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र दरम्यान विशेषतः आदिवासी भागांसाठी रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी इंदूर आणि मुंबईदरम्यानचा सर्वात जलद रेल्वेमार्ग असेल.

त्यामुळे प्रवासाचे अंतर अंदाजे ३०० किलोमीटरने कमी होईल. या रेल्वेमार्गात एकूण ३० नवीन रेल्वेस्थानके बांधली जाणार आहेत. या मार्गामुळे नाशिक, धुळे, खरगोन, बडवानी या आदिवासी भागांना जोडणी मिळेल. शिवाय कृषी उत्पादनांची जलद वाहतूक होईल.

या गावांचे होणार भूसंपादन

मनमाड- इंदूर रेल्वेमार्गासाठी मनमाडसह नांदगाव तालुक्यातील मनमाड, अस्तगाव, पांझणदेव, खादगाव, नवसारी, भार्डी या सहा, तर मालेगाव तालुक्यातील चोंढी-जळगाव, काळेवाडी, घोडेगाव चौकी, वहऱ्हाणे, मेहुण, ज्वार्डी बु., येसगाव, सवंदगाव, सायणे बु., माल्हाणगाव, चिखलओहोळ, झोडगे आदी गावांचे भूसंपादन करण्यात येणार आहे. येत्या काळात संबंधित गावांमध्ये भूसंपादन प्रक्रिया गतिमान करण्यात येणार आहे. सध्या प्रकल्पाचे मध्य प्रदेशातील काम पूर्णत्वाच्या जवळ पोहोचले आहे. तर महाराष्ट्रातील धुळे व मालेगाव तालुक्यातील भू-अधिग्रहण प्रक्रियेला आता गती मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT