सिन्नर (नाशिक) : सिन्नर तालुका खरेदी-विक्री संघाने शेतकऱ्यांकडून हमीभावाने खरेदी केलेले सोयाबीन वखार महामंडळाच्या गोडाऊनला नेल्यानंतर निरीक्षकांकडून खरेदी योग्य नसल्याचे सांगून 'रिजेक्ट' करत माघारी धाडल्याने खरेदी- विक्री संघ व शेतकऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. सोयाबीन हमीभाव हा केंद्र सरकाचा निर्णय असल्याने येत्या 1 जानेवारीला केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान नाशिकला येणार असून त्यांच्याशी चर्चा करुन याप्रश्नी तोडगा काढण्याची हमी कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली.
सिन्नर तालुका खरेदी -विक्री संघाने घेतलेले सोयाबीन जुने असल्याने त्यातून कमी तेल उत्पादीत होते. तसेच बहुतांश सोयाबीन मातीमिश्रित असल्याचे वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. तथापि, एनसीसीएफ संस्थेच्या अधिकारी पाटील यांच्याशी संपर्क साधत मंत्री कोकाटे यांनी माती मिश्रित वैगेरे असल्यास ठिक आहे, परंतु सरसकट सोयाबीन नाकारता येणार नाही, अशा शब्दांत ठणकावले आहे. शासकीय हमीभाव केंद्र उभारलेल्या ठिकाणीच ग्रेडर नेमलेला असता तर हा पेच निर्माण झाला नसता. केंद्रावर ग्रेडर का नेमला नाही? असा सवालही त्यांनी अधिकाऱ्यांना केला. यावेळी सिन्नर तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन नितीन आव्हाड, व्हा. चेअरमन संजय गोराणे, संचालक अरुण वाजे, व्यवस्थापक दत्ता राजेभोसले, शरद नवले, जिल्हा विपणन अधिकारी पी. आर. पाटील आदी उपस्थित होते.
'नाफेड'मार्फत काही एजन्सी नेमून शासकीय हमीभाव दराने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यात सहा ठिकाणी सदर केंद्र सुरू आहेत. वावी केंद्रावरील खरेदीनंतर प्रश्न उद्भवला आहे. आता केंद्रीय कृषी मंत्र्यांसोबतच्या चर्चेत काय निर्णय होतो, याकडे सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांच्या रखडलेल्या विविध शासकीय अनुदानाचा विषयदेखील मंत्री कोकाटे यांच्याकडून केंद्रीय मंत्र्यांसमोर चर्चेला घेतला जाणार आहे.
सिन्नर तालुका खरेदी-विक्री संघाकडूनही वीस दिवसांपूर्वी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांकडून करार करून तालुक्यातील वावी येथे शासकीय हमीभाव दराने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. या वीस दिवसांत खरेदी-विक्री संघाने 87 शेतकऱ्यांकडून 1334 क्विंटल सोयाबीन 4892 रुपये दराने खरेदी केले आहे. यापैकी काही सोयाबीन तालु्नयातील मुसळगाव येथील वखार महामंडळाच्या गोडाऊनला पाठवली होती. 'एनसीसीएफ' संस्थेच्या निरीक्षकाने (ग्रेडर) सोयाबीनची तपासणी करुन खरेदीयोग्य नसल्याचे सांगत परत पाठवली. या सोयाबीनचा निर्णय झाल्याशिवाय खरेदी व्यवहार सुरु करायचा नाही, अशी भूमिका संघाने घेतली आहे.