नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क | कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर नाशिक दौऱ्यावर असून ते नाशिक येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. जिल्ह्यातील बागलाण तालुक्यामध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे तर 1,298 हेक्टर शेतीपिकाला अवकाळीचा तडाखा बसला आहे. 2000 शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
शहर आणि तालुक्यात दोन दिवस अवकाळी पाऊस झाल्याने शेतमालाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. हरसूल भागात शेकडो एकर केशर आंबा लागवड झालेली आहे. काही भागांत फळ धरण्यास सुरुवात झालेली आहे. तर काही भागांतील केशर आंबा बाजारपेठेत येण्यासाठी काही दिवस बाकी असतानाच अवकाळी पावसाने दणका दिल्याने आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे नाशिकचे असून त्यांच्याकडून न्याय मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
अवकाळी पाऊस व गढुळलेल्या हवामानाने रायवळ आंबा आणि करवंदे, जांभूळ असा रानमेवादेखील दुर्मीळ होणार आहे. आदिवासी बांधवांना पावसाळ्यापूर्वी रोजगाराचे हे हमखास साधन आहे. पावसाळ्यातील चार महिन्यांच्या चीजवस्तू खरेदी करण्यासाठी आंबे, जांभूळ, करवंद आदी रानमेवा विक्रीतून पैसे मिळविले जातात. मात्र, आता अवकाळीने यंदा रानमेवा दुर्मीळ होणार आहे.
बागलाण तालुक्यात सरासरी ८५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यात उन्हाळी कांदा पिकाला फटका बसला असून, अनेक शेतकऱ्यांचा शेतात काढून ठेवलेला कांदा भिजला आहे. दुसरीकडे परिपक्व झालेला कांदाही अतिपावसामुळे जमिनीतच खराब होणार आहे. यामुळे तो माल काढून बाजारात नेल्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही. यामुळे एकाचवेळी आवक वाढून भाव गडगडण्याचीही शक्यता आहे. कांद्याबरोबरच डाळिंब पिकालाही अवकाळीचा फटका बसला आहे. यामुळे एकूण उत्पादनात घट येणार असून गहू, हरभऱ्याचाही हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. भाजीपाला पिकांचेही मातेरे झाले आहे.