नाशिक : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना शिक्षा दिली तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पुन्हा घेण्याची वेळ येईल आणि जनतेचा पैसा खर्च होईल, असे निरीक्षण नाशिक सत्र न्यायालयाने नोंदवले आहे. विरोधकांनी यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. याबाबत मंत्री कोकाटे यांना प्रश्न विचारला असता ते पत्रकारांवरच संतापले.
निकाल अद्याप लागलेला नाही, स्थागिती देण्यात आली आहे. विरोधक, मीडियाकडून तेच तेच सुरू आहे. न्यायालयाच्या निकालावर संशय घेणे हा मूर्खपणा असून, विरोधकांचे हे राजकीय षडयंत्र सुरू असल्याचा आरोप राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी करत संताप व्यक्त केला.
मंत्री कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयाचे रविवारी (दि. १६) नाशिकमध्ये उद्घाटन करण्यात आले. या वेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे कार्यालय सुरू केले आहे. येथे आलेल्या समस्यांचे निराकरण राज्यपातळीवर करण्याचा प्रयत्न केला जाईल. आठवड्यातून दोन दिवस ते स्वतः येथे उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, न्यायालयाच्या निकालावर विरोधकांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता मंत्री कोकाटे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, त्याच-त्याच मुद्द्यांवर वारंवार चर्चा करणे योग्य नाही. हा न्यायालयीन विषय असून, त्यावर अधिक बोलणे उचित ठरणार नाही. जिल्हा न्यायालयाच्या निकालाला स्थगिती देण्यात आलेली आहे, अंतिम निकाल अद्याप लागलेला नाही. अपिलावर सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या निर्णयावर संशय घेणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे. तसेच, विरोधक सोयीस्करपणे वक्तव्ये करत असून, यामागे त्यांचे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे, यावर विचारले असता मंत्री कोकाटे यांनी आमचाही हीच इच्छा आहे. कोणत्या पक्षाच्या प्रमुखाला मुख्यमंत्री व्हावे असे वाटणार नाही. आमच्या सर्व, मंत्री, आमदारांची इच्छा आहे त्यांनी मुख्यमंत्री व्हावे असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात शेतीयोग्य जमिनीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या पाच वर्षांत देशभरात 6.42 लाख हेक्टर शेतीयोग्य जमीन कमी झाली असून, त्यातील 3.25 लाख हेक्टर जमीन महाराष्ट्रातूनच नाहीशी झाली आहे. यासंदर्भात विचारले असता मंत्री कोकाटे म्हणाले, रस्ते, पाटबंधारे, बाजार समित्या आणि विविध विकास प्रकल्पांसाठी जमीन लागते. या गोष्टी हवेत करू शकत नाही. त्यामुळे प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या प्रकल्पांसाठी जमीन उपलब्ध करून द्यावी लागते. त्यामुळे शेतीयोग्य जमिनीचे क्षेत्र कमी होणे साहजिकच आहे. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, 'आता विकासकामे थांबवू शकत नाही. समृद्धी महामार्ग थांबवू शकत नाही. नव्या शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे शेतीयोग्य जमीन कमी होत आहे, हे मला मान्य आहे.'