नाशिक : काही लोक उतावीळ आहेत. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार न्याय देतात. काही वेळेस वाट बघावी लागते. लगेच भाष्य करणे चुकीचे आहे. वेट अँड वॉचची भूमिका घेतली की, फायदा होतो. हा अनुभव माझ्यासह मंत्री छगन भुजबळांनादेखील आला आहे. जहा नहीं चैना, वहा नहीं रैना... हे भुजबळांचे ते भाष्य उतावीळपणाचे होते, असा टोला मंत्री माणिकराव कोकाटे यांनी लगावला. दरम्यान, भुजबळ यांचा मंत्रिपदाचा नाशिक आणि महाराष्ट्राला फायदा होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि छगन भुजबळ यांनी मंगळवारी (दि. 20) कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यावर राज्याचे कृषिमंत्री कोकाटे यांनी भाष्य केले आहे. मंत्री कोकाटे म्हणाले की, भुजबळ यांचे मंत्रिमंडळात स्वागत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी सर्वसमावेशक मंत्रिमंडळ तयार केले आहे. ओबीसी चेहरा असावा, असे त्यांना आधीपासूनच वाटत होते. पालकमंत्रिपदासाठी चुरस वगैरे मी मानत नाही. भुजबळ यांचा नाशिक आणि महाराष्ट्राला फायदा होणार आहे. जास्त आमदार म्हणून पालकमंत्री पदावर दावा, असे काहीही नाही. मी कशावरच दावा करत नाही. पक्ष महत्त्वाचा आहे, एकाच पक्षात राहून आपण गटबाजी करत राहिलो तर काही उपयोग होणार नाही. भुजबळ आणि माझ्यात कोणतेही मतभेद नसल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. भुजबळ आमच्यापेक्षादेखील सिनियर आहेत. आता त्यांना न्याय मिळाला आहे. आम्हाला सगळ्यांना आणि महाराष्ट्राला त्याचा फायदा होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावर मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता मंत्री कोकाटे म्हणाले की, मनोज जरांगे यांचे ते व्यक्तिगत मत आहे. त्यांचे आणि भुजबळांचे काय आहे ते मला माहिती नाही. अजित पवार खंबीर नेतृत्व आहे. मी जर अजितदादांच्या जवळ लवकर गेलो असतो तर फायदा झाला असता, असो... देर आये दुरुस्त आये, असे त्यांनी यावेळी सांगितले.