नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क | राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सोमवार (दि.19) राेजी खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. बैठकीत अपूर्ण माहिती देणाऱ्या आणि अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कृषीमंत्री चांगलेच संतापले.
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेतली. या बैठकीत अनुपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले. त्याचबरोबर खरीप हंगाम कालावधीमध्ये अधिकारी रजेवर किंवा संपावर जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
तसेच खरीप हंगाम कालावधीमध्ये संप पुकारुन शेतकरी आणि सरकारला कोणीही वेठीस धरणार नाही, अन्यथा प्रशासकीय कारवाई केली जाईल असा इशारा देखील त्यांनी बैठकीत दिला आहे. या बैठकीनंतर पुढील दोन दिवसांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कृषी विभाग सज्ज असल्याचे आश्वासन त्यांना देणार असल्याचे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.
महावितरण कंपनीचे जे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. त्यांच्याकडे सोलर पंपाच्या बाबतीत अपूर्ण माहिती उपलब्ध असल्याने माणिकराव कोकाटे यांनी बैठकीतच महाविरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधून याबाबत तातडीने माहिती घेतली. तसेच मागेल त्याला शेततळे मग मागेल त्याला सोलर पंप का नाही? असा प्रश्न कोकाटे यांनी बैठकीत उपस्थित केला होता.