Mango Crop Insurance Pudhari
नाशिक

Mango Crop Insurance | दुष्काळाच्या झळांत सापडलेल्या आंबा उत्पादकांना दिलासा; पिकविमा हप्प्यात मोठी घट

Mango Crop Insurance | पीक विमा हप्प्यात हेक्टरी ५,९०० रुपयांची घट; १३,६०० ऐवजी आता ८,५०० रुपये

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
दुष्काळाचे संकट, हवामानातील वाढती अनिश्चितता आणि आंबा उत्पादनावरील वाढता खर्च यामुळे चिंतित असलेल्या कोकणातील आंबा बागायतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. सन २०२६-२७ हंगामासाठी आंबा पिकाचा विमा हप्ता प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० रुपयांवरून ८ हजार ५०० रुपयांपर्यंत कमी करण्यात आला असून, त्यामुळे शेतकऱ्यांची हेक्टरी ५ हजार १०० रुपयांची थेट बचत होणार असल्याच्या माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

विमा हप्ता कमी झाल्याने आंबा उत्पादकावरील आर्थिक भार कमी होणार असून, अधिकाधिक शेतकरी विमा संरक्षणाच्या कक्षेत येण्यास मदत होणार आहे. कोकणातील आंबा बागायतदारांसाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

आंबा पिकासाठी विमा संरक्षणाचा कालावधी १५ मे ऐवजी ३१ मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे हंगामाच्या अखेरीस होणारा अवकाळी पाऊस, वादळी वारे किंवा इतर प्रतिकूल हवामान बदलांमुळे होणाऱ्या नुकसानाविरुद्ध शेतकऱ्यांना अधिक काळ संरक्षण मिळणार आहे.

याशिवाय, फळपीक विमा योजनेत प्रथमच नारळ व सुपारी या पिकांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे कोकणातील विविध फळबाग उत्पादकांना विमा संरक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांसाठी विमा हप्त्यातील ही कपात दिलासादायक ठरणार असली, तरी योजनेचा लाभ अधिसूचित क्षेत्र, पात्रता निकष आणि विमा अटींनुसारच मिळणार आहे.

विम्यातील महत्त्वाचे बदल

  • विमा हप्ता : ₹१३,६०० वरून ₹८,५०० प्रतिहेक्टरी

  • बचत : ५,९०० रुपयांची घट

  • कालावधी : १५ मे वरून ३१ मे पर्यंत

  • प्रथमच नारळ व सुपारी पिकाचा समावेश

  • कोकणातील आंबा बागायतदारांना मोठा दिलासा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT