सटाणा (नाशिक) : बागलाण तालुक्यातील सुप्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी डोंगरावरून पाय घसरून पडल्याने मायलेकाचा दुर्दैवीरीत्या मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. २७) दुपारनंतर घडली आहे. सायंकाळी उशिरा दोघांचे मृतदेह डोंगर कपारीतून काढून नामपूर येथे शवविच्छेदनासाठी घेऊन जाण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती जायखेडा पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.
कळवण तालुक्यातील अभोणा येथील सुनील पावरा हे कुटुंबीयांसह दुपारी मांगीतुंगी येथे पर्यटनासाठी आले होते. दुपारी एक वाजता त्यांनी मांगीतुंगी डोंगरावर चढाई करण्यास प्रारंभ केला. यादरम्यान त्यांची पत्नी गीता पावरा (३५) व मुलगा राजवीर पावरा (५) यांचा पाय घसरून दरीत कोसळले. यातच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत जायखेडा पोलिसांना कळविल्यानंतर, सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर काळे, हवालदार शेखर शिरोळे, पोलिस नाईक दिनेश जाधव, पृथ्वीराज बारगळ यांनी स्थानिकांची मदत घेत मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
१०८ फुट उंच ऋषभदेव यांची मूर्ती पाहून झाल्यानंतर पायऱ्यांद्वारे पावरा कुटुंब उंच शिखराकडे जात होते. पायऱ्यांवरून पाणी वाहत असल्याने पायातील बूट ओले होतील, म्हणून मायलेक पायऱ्यांच्या संरक्षक भिंतीवरून चढत असताना हा अपघात घडल्याचे सांगितले जाते.