Haranbari Dam
नाशिक

Haranbari Dam | हरणबारी धरणात मासेमारी करणाऱ्या व्यक्तीचा बुडून मृत्यू; वाचविण्यास गेलेल्या तरुणाला पोलिसांचे जीवनदान

Haranbari Dam | हरणबारी धरणात मासेमारी करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

जायखेडा : पुढारी वृत्तसेवा

बागलाण तालुक्यातील हरणबारी धरण परिसरात मासेमारीसाठी गेलेल्या व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर त्याला वाचवण्यासाठी धाडसाने पाण्यात उतरलेल्या तरुणाला पोलीस व स्थानिक ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळे सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. रविवारी (दि. २) सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

विजय महादू सोनवणे (४५, रा. वडे दिगर, हरणबारी, ता. सटाणा) हे हरणबारी धरणात मासेमारीसाठी गेले होते. मासेमारी करीत असताना त्यांच्या ताब्यातील हवेने भरलेली ट्यूब पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. ती परत आणण्याच्या प्रयत्नात ते पाण्यात उतरले होते. मात्र, धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो होत असल्याने पाण्याचा वेग प्रचंड असल्याने ते पाण्यात बुडत होते.

हे पाहताच रमेश सीताराम सोनवणे (२५, रा. दगडपाडा, हरणबारी, ता. सटाणा) यांनी विजय सोनवणे यांना वाचवण्यासाठी धाडसाने पाण्यात उडी घेतली होती. मात्र, पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे तेही अडकले. सायंकाळी ५.३० च्या सुमारास दोन व्यक्ती पाण्यात पडल्याची माहिती मिळताच जायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर काळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत तातडीने बचावकार्य सुरू केले.

स्थानिक नागरिकांच्या मदतीने विजय सोनवणे यांना बाहेर काढून घटनास्थळी सीपीआर देण्यात आला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, पाण्यात अडकलेल्या रमेश सोनवणे यांना पोलीस व ग्रामस्थांनी दोरीच्या साहाय्याने सुखरूप बाहेर काढले.

त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. ही बचाव मोहीम पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

बचाव कार्यात पोलीस निरीक्षक सागर काळे, पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे, हेड कॉन्स्टेबल देवा गोविंद, महेश सोनवणे, कॉन्स्टेबल पृथ्वीराज बारगळ व वळवी यांनी सक्रिय सहभाग घेतला.

नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

हरणबारी धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो होत असल्यामुळे पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान व धोकादायक आहे. त्यामुळे नागरिकांनी धरण परिसरात मासेमारी करणे, पोहणे अथवा जीव धोक्यात घालणारे प्रकार टाळावेत आणि प्रशासनाच्या सुरक्षा सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक सागर काळे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT