नाशिक: मालेगाव येथील गाजत असलेल्या बोगस शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी आणि कार्यालयीन अधीक्षकासह प्रमुख अधिकाऱ्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे नाशिकच्या शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत गोपनीय पद्धतीने ही कारवाई केली. मंगळवारी (दि.९) मध्यरात्री जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी आणि एका कार्यालयीन अधीक्षकाला त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. या अधिकाऱ्यांवर बोगस शिक्षक भरती प्रकरणात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घोटाळ्यातील धागेदोरे थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्याने प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे, याचा अंदाज येत आहे.
यापूर्वी या प्रकरणात एका खासगी शिक्षण संस्थेच्या चालकासह तिघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही मोठी कारवाई करण्यात आल्याचे समजते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अटकेमुळे या घोटाळ्यात आणखी कोण-कोण सामील आहे, हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून या अधिकाऱ्यांची कसून चौकशी केली जात असून, यातून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कारवाईने शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे.