Shab-e-Barat Malegaon 
नाशिक

Shab-e-Barat Malegaon | मालेगावमध्ये शब-ए-बारात, श्रद्धा - भक्तिभावाचा संगम

Shab-e-Barat Malegaon | कब्रस्तान परिसरात बॅरिकेडिंग, सीसीटीव्हीची नजर

पुढारी वृत्तसेवा

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा

शहरात मंगळवारी (दि. ३) मुस्लीम बांधवांचा पवित्र शब-ए-बारात सण श्रद्धा व भक्तिभावाने साजरा होणार आहे. यानिमित्त मुस्लीम बांधव पूर्वजांच्या स्मृतीनिमित्त मशिदीत नमाजपठण करत कब्रस्तानात आपापल्या आप्तेष्टांच्या कबरीजवळ रात्रभर दुआ (प्रार्थना) पठण करतात.

शब-ए-बारातच्या रात्री कब्रस्तान परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने तसेच यापूर्वी घडलेल्या बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. शहरातील आठही कब्रस्तान परिसर व इतर महत्त्वाच्या ठिकाणी ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

सुरक्षेच्या दृष्टीने कब्रस्तानाकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेडिंग करून दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार असून, केवळ पादचाऱ्यांनाच प्रवेश दिला जाईल. सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात सशस्त्र पोलिस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे. अपर पोलिस अधीक्षक तेगबीरसिंह संधू यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी नुकतीच कब्रस्तान परिसराची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

यावेळी संबंधित पोलिस ठाण्यांचे अधिकारी व कब्रस्तानांचे विश्वस्त यांना आवश्यक सूचना दिल्या. शहरातील बडा कब्रस्तानात शब-ए-बारातच्या रात्री मोठी गर्दी होत असल्याने विशेष दक्षता घेण्यात येणार आहे.

मालेगाव शहरातील बडा कब्रस्तान, आयशानगर, सोनापुरा व संगमेश्वर या चार प्रमुख कब्रस्तानांसह आठ कब्रस्तानांत शव-ए-बारातनिमित्त दुआपठण केले जाते. यासाठी महानगरपालिका प्रशासनाने सर्व कब्रस्तानांची स्वच्छता, पथदीप व्यवस्था, पाणीपुरवठा व अन्य आवश्यक उपाययोजना पूर्ण केल्या आहेत.

सणाच्या पूर्वसंध्येला अनेक मुस्लीम बांधवांनी आपल्या पूर्वजांच्या कबरींची स्वच्छता करून रंगरंगोटी केली. सन २००६ मध्ये शब-ए-बारातप्रसंगी बॉम्बस्फोट झाल्यामुळे पोलिस प्रशासनातर्फे गत दीड दशकापासून मोठी खबरदारी घेतली जात आहे.

शब-ए-बारातची खैरात मिळविण्यासाठी यापूर्वी देशभरातून मोठ्या प्रमाणावर भिकारी शहरात येत. बॉम्बस्फोटानंतर भिकाऱ्यांना बंदी करण्यात आली. टेहळणी मनोरे, सीसीटीव्ही यासह अन्य कठोर उपाययोजना करण्यात आल्या.

भिकाऱ्यांवर लक्ष

शब-ए-बारातनिमित्त मोठ्या प्रमाणावर दानधर्म केला जात असल्याने राज्यासह परराज्यातून भिक्षेकरी मालेगावमध्ये दाखल होतात. २००६ मधील बॉम्बस्फोटानंतर कब्रस्तान परिसरात भिकाऱ्यांना बंदी घालण्यात आली असून, यंदाही त्यांची विशेष दखल घेतली आहे. कब्रस्तान व मशिदींच्या परिसरात त्यांना मज्जाव करण्यात आला आहे.

शब-ए-बारात शांततेत व सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी पोलिस प्रशासन, महानगरपालिका व सामाजिक घटक समन्वयाने काम करत आहेत. प्रशासनाला स्थानिक स्वयंसेवक, पोलिस मित्र, सामाजिक कार्यकर्ते व्यापक प्रमाणात सहकार्य करतात. शेकडो स्वयंसेवकांची मदत पोलिस प्रशासन घेते. कब्रस्तानपासून साधारण अर्धा किलोमीटरपर्यंतचे रस्ते बंद केले जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT