नाशिक

मालेगाव : साथी निहाल अहमद यांच्या कुटुंबाची जनता दलाला सोडचिट्ठी

backup backup

मालेगाव; पुढारी वृत्तसेवा : जनता दल (सेक्युलर)ची बुलंद तोफ म्हणून प्रसिद्ध असलेल्या दिवंगत माजीमंत्री निहाल अहमद यांच्या कुटुंबाने समर्थकांसह पक्षाला सोडचिट्ठी दिली. शहर जिल्हाध्यक्ष शान ए हिंद यांनी उर्दू मीडिया सेंटरमध्ये सोमवारी (दि.2) पत्रकार परिषद घेत साश्रुनयनांनी पक्षत्यागाची घोषणा केली. जनता दलाचे सर्वेसर्वा माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केंद्रातील 'एनडीए'शी युती केल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगत, जातीयवादी शक्तीविरोधात धर्मनिरपेक्षता बुलंद करण्याच्या दृष्टीनेच पुढील भूमिका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे जनता दलातील पदाधिकार्‍यांची पुणे येथे राज्यस्तरीय बैठक पार पडली होती. त्यात भाजपशी युती अमान्य ठरविण्यात आली होती. या बैठकीला ज्येष्ठ नेत्या साजेदा अहमद उपस्थित होत्या. त्याचा संदर्भ देत शान ए हिंद म्हणाल्या, 1950 पासून वडिल निहाल अहमद राजकारणात सक्रीय होते. ते अखेरच्या क्षणापर्यंत धर्मनिरपेक्ष तत्वांशी एकनिष्ठ राहिले. त्यांचे राजकारण बालपणापासून जवळून पाहिले. तत्कालिन नेते शरद यादव यांच्या भूमिकेने पक्षात फूट पडली. 1999 मध्ये जनता दलाची बांधणी झाली. तेव्हा निहाल अहमद यांनीच पक्षाच्या नावात सेक्युलर शब्द जोडण्याची सूचना केली होती. चारेवाली बाई आमच्यात भिनले आहे. अशा परिस्थितीत जातीयवादी पक्षांशी हातमिळवणी दुखदायक असून, ते निहाल अहमद यांच्या विचारात न बसणारे असल्याने पक्ष सोडावा लागत असल्याचे त्यांनी अश्रू पुसत सांगितले. परंतु, आता कोणत्या पक्षात जाणार याप्रश्‍नांवर त्यांनी मौन बाळगले. धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरच योग्य तो निर्णय घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले.

त्यांचे पती जनता दलाचे सचिव मो. मुस्तकिम मो. मुस्तफा यांनी, निहाल अहमद यांच्या निधनानंतर पक्ष स्तरावर 'मेरा शहर मेरा दबदबा' ही मोहीम राबविली होती. तेव्हा निहाल अहमद यांच्या विचारांना मानणार्‍या 12 हजार सदस्यांची नोंदणी झाली होती. राज्यस्तरीय नेत्यांनी पुढील भूमिकेसाठी एक समिती गठीत केली आहे. त्याप्रमाणे आम्हीही समर्थकांना विचारात घेऊन पुढील निर्णय घेऊ, असे सांगितले.
याप्रसंगी माजी उपमहापौर रशीद येवलेवाले, माजी नगरसेवक सोहेल करीम, सय्यद सलीम, अब्दूल बाकी, खुर्शीद काबूल, आरिफ हुसेन पापा, मौलाना शकील शम्सी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सर्वच प्रमुख पक्षात फाटाफूट

शहरातील राजकारणात पक्षस्तरीय दबदबा राखणार्‍या सर्वच मातब्बरांनी घराण्यांनी 2014 नंतर पक्षांतराचा मार्ग स्वीकारला. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार मौलाना मुफ्ती, नंतर काँग्रेसमधील शेख कुटुंब, आणि आता निहाल अहमद यांचे कुटुंबही नव्या मार्गावर निघाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT