Malegaon Ramzan Eid Shopping Pudhari
नाशिक

Malegaon Ramzan Eid Shopping| मालेगावी ईदच्या खरेदीसाठी उसळली गर्दी

Malegaon Ramzan Eid Shopping| आबालवृद्धांच्या समावेशाने फळबाजारही फुलला

पुढारी वृत्तसेवा

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा

पाच दिवसांवर रमजान ईद येऊन ठेपली असताना शहरासह बाहेरगावातील मुस्लीम बांधव ईदच्या खरेदीसाठी गर्दी करीत आहे. संध्याकाळी रोजा इफ्तारीनंतर रात्री उशिरापर्यंत आबालवृद्ध बाजारपेठेत येत असल्याने रात्रीचा दिवस झाला आहे.

शहरात मोठ्या संख्येने यंत्रमाग मजूर असून, हातावर पोट भरणऱ्या गोरगरीब लोक आपापल्या ऐपतीप्रमाणे नवनवीन कपडे, पादत्राणे, सुकामेवा, खजूर, टोप्या, शेवया, सुतरफेणी खरेदी करत आहेत.

शहरात सटाणा, देवळा, कळवण, साक्री, नांदगाव, झोडगे, नामपूरसह इतर जिल्ह्यांतूनही मुस्लीम बांधव ईदच्या खरेदीसाठी शहरात येत आहेत. गेल्या महिनाभरापासून रंगविरंगी कलाकुसर केलेल्या टोप्यांना विशेष मागणी आहे. सायंकाळी रोजा इफ्तारीसाठी फळांच्या खरेदीसाठी शहरातील रस्ते सायंकाळी आणि फळबाजार गर्दीने फुलून गेला आहे.

शहरात टरबूज, खरबूज, आंबे, द्राक्ष यासह इतर फळांची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून, सायंकाळच्या सुमारास फळे खरेदीसाठी सरदार चौक, गूळबाजार, रामसेतू, किदवाई रोड, नवीन बसस्थानक या भागांत रोजेधारकांची गर्दी वाढली आहे.

रात्री उशिरापर्यंत कापड बाजारात देखील रेडिमेड कपडे खरेदीसाठी महिला, मुले यांची गर्दी होत आहे. त्यामुळे पूर्व भागात नेहमी दिसणारी गर्दी पश्चिम भागातदेखील दिसू लागली आहे. त्यामुळे रामसेतूसह सटाणानाका, मोसमपूल, लोढा मार्केट भागात देखील मुस्लीम महिला रात्री उशिरापर्यंत घराबाहेर पडत असल्याने पूर्व भागाबरोबरच पश्चिम भागात देखील रात्री उशिरापर्यंत दुकाने उघडी राहत आहेत.

ईदनिमित्त ग्राहक खरेदीसाठी घराबाहेर पडल्याने व्यावसायिकांमध्ये समाधान आहे. ईदसाठी तरुणवर्गही तयार कपडे खरेदीला प्राधान्य देते. कपडे शिवून घेणाऱ्यांची संख्या घटली असून, नागरिकांमध्ये कपडे शिवून घेण्यासाठी दिसणारा उत्साह यंदा दिसत नसल्याचे किदवाई रोडवरील रहेबर टेलर्स यांनी सांगितले.

रमजान काळात वाढली आर्थिक उलाढाल

पूर्व भागात रमजान ईदच्या खरेदीची धूम सुरू आहे. पश्चिम भागातही मोठी गर्दी होऊ लागली आहे. मध्यरात्रीपर्यंत किदवाई रोड, मोहंमद अली रोड, नवा बसस्थानक, मुशावर्त चौक, अंजुमन चौक, चंदनपुरी गेट भागांत मोठी गर्दी दिसून येते. मुस्लीम उच्चभ्रू, उच्च मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय नोकरदार लोकांनी संगमेश्वरातील महात्मा फुले रोड, मोसमपूल, सटाणा रोड, सटाणा नाका आदी ठिकाणी खरेदीसाठी गर्दी केली आहे. शहरालगतचे मनमाड, चांदवड, देवळा, सटाणा, कळवण, साक्री, पिंपळनेर, चाळीसगाव आदी भागांतील मुस्लीम बांधवही येथे खरेदीसाठी येतात. ईद जवळ येत असल्याने खरेदीसाठी गर्दी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT