नाशिक

Malegaon Development Issues | मालेगाव : वादांची धग, विकासाची राख

Malegaon Development Issues |तीन वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर मालेगावकरांनी बदलाची अपेक्षा केली होती. निवडणूक म्हणजे केवळ सत्तांतर नव्हे, तर शहराला दिशा देण्याची संधी, ही माफक अपेक्षा.

पुढारी वृत्तसेवा

मालेगाव : हेमंत धामणे

तीन वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर मालेगावकरांनी बदलाची अपेक्षा केली होती. निवडणूक म्हणजे केवळ सत्तांतर नव्हे, तर शहराला दिशा देण्याची संधी, ही माफक अपेक्षा. सत्तास्थापनेच्या काही दिवसांतच मालेगावचे राजकारण पुन्हा एकदा वादांच्या गर्तेत सापडले.

विकासाचा अजेंडा मांडण्याआधीच तो बाजूला फेकला गेला की, मुद्दाम बाजूला सारला गेला? उपमहापौरांच्या दालनातील टिपू सुलतानच्या छायाचित्रावरून सुरू झालेला वाद, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेले बनावट जन्मदाखल्याचे आरोप आणि मालेगावला अतिरेक्यांचे केंद्र ठरवण्याचे दावे, या साऱ्यांनी शहराला पुन्हा संशयाच्या चौकटीत उभे केले.

प्रश्न असा आहे की, या रणधुमाळीत मालेगावकरांच्या आयुष्यात नेमका कोणता बदल झाला? वाद पेटले, टीव्ही डिबेट्स रंगल्या, सोशल मीडियावर आग लागली. पण त्याच वेळी रस्त्यांवरील खड्डे तसेच राहिले, वाहतूक कोंडी वाढत गेली, कचऱ्याचे ढीग उंचावत गेले, विद्युत विभागातील नमाजपठण आणि त्यावर हनुमान चालीसापठणाचे प्रत्युत्तर, या घटनांवर राज्यभर चर्चा झाली.

मात्र रुग्णवाहिका कोंडीत अडकते, हे कुणाच्या चर्चेचा विषय झाले? आज मालेगावची खरी ओळख वाद नाही, तर वेदना आहेत. उखडलेले रस्ते मृत्यूचे सापळे झाले आहेत. पावसाळ्यात खड्डे, उन्हाळ्यात धूळ, हवेत श्वास घेणेही अवघड झाले आहे.

कचरा वेळेवर उचलला जात नाही, नाले तुंबलेले, सार्वजनिक शौचालयांची अवस्था लाजिरवाणी. महापालिकेची रुग्णालये मनुष्यबळ आणि औषधांच्या तुटवड्यात अडकली आहेत. परिणामी खासगी रुग्णालयांवर अवलंबित्व वाढते आणि सर्वसामान्यांचा खिसा रिकामा होतो. या सगळ्यांवर कडी म्हणजे बेरोजगारी.

तरुणांच्या हाताला काम नाही, कौशल्य विकासाचे नियोजन नाही, उद्योगांना प्रोत्साहन नाही. असंतोष वाढतोय, पण त्यावर ठोस धोरण नाही. प्रदूषण वाढले आहे. दमा आणि श्वसनविकारांचे रुग्ण वाढत आहेत. पण प्रदूषण नियंत्रणासाठी केवळ कागदी उपाय दिसतात.

मालेगावला कोणत्याही प्रतीकांची लढाई नको. मालेगावला रस्ते, पाणी, आरोग्य, स्वच्छता, रोजगार आणि शुद्ध हवा हवी आहे. राजकारणाने जर हे प्रश्न केंद्रस्थानी आणले नाहीत, तर इतिहास एकच निकाल देईल. वाद जिंकतील, पण मालेगाव हरवेल आणि शहर हरवणे, ही कोणत्याही राजकीय विजयापेक्षा मोठी पराभवाची गोष्ट असेल.

मालेगावला दिशा हवी,

ध्रुवीकरण नको मालेगावला आज कोणी तारणहार नको, फक्त प्रामाणिक काम हवे आहे. धर्म-राजकारणाच्या रणधुमाळीत अडकलेले शहर आता विचारत आहे. वादांवर किती दिवस जगायचे? खड्ड्यांतून कधी बाहेर पडायचे? आणि विकासाकडे कधी वळायचे? राजकीय इच्छाशक्ती नसेल, तर वाद सुरूच राहतील. पण त्याची किंमत मालेगावकरांना त्यांच्या आरोग्याने, रोजगाराने आणि भवितव्याने मोजावी लागेल, हीच खरी शोकांतिका आहे.

हे प्रश्न धर्माचे नाहीत. हे प्रश्न पोटाचे, आरोग्याचे आणि भवितव्याचे आहेत, तरीही राजकीय सोयीसाठी वाद पुढे आणले जातात. कारण विकासावर बोलायला नियोजन, जबाबदारी आणि उत्तरदायित्व लागते. वादांवर बोलायला मात्र घोषणा पुरतात.
- निखिल पवार,

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT