मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक यांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेने मालेगाव आणि परिसरात दुचाकीचोरांविरुद्ध मोठी मोहीम उघडली आहे. मोसम पूल परिसरात सापळा रचून पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी आणखी दोन साथीदारांच्या मदतीने तब्बल ७महागड्या दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
पोलिसांनी या टोळीकडून ३ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, या कारवाईमुळे आयेशानगर आणि रमजानपुरा पोलिस ठाण्यांमधील चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. शहर व ग्रामीण भागात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती.
या गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, मोसम पूल परिसरात दोन संशयित चोरीची दुचाकी घेऊन येणार आहेत. पोलिसांनी तत्काळ सापळा रचून साद मोहम्मद इरफान (२४, रा. रजा चौक) आणि मोमीन मोहम्मद दानिश (१९, रा. रमजानपुरा) यांना ताब्यात घेतले.
त्यांच्या ताब्यातील दुचाकीबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी ही दुचाकी नया इस्लामपुरातून चोरल्याची कबुली दिली. तपासात ही बाइक आयेशानगर पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यातील असल्याचे समोर आले.
संपूर्ण टोळी गजाआड
या दोघांची अधिक चौकशी केली असता, त्यांनी त्यांचे साथीदार हमजा इस्तियाक अहमद (२०) आणि सय्यद इजाज सय्यद यासीन (१९, दोघे रा. गुलाब पार्क, मालेगाव) यांच्या नावांचा खुलासा केला. पोलिसांनी तातडीने कारवाई करीत या दोघांनाही अटक केली. या चारही आरोपींनी मालेगाव शहर आणि ग्रामीण भागातून एकूण ७ दुचाकी चोरल्याचे कबूल केले आहे. आरोपींना पुढील तपासासाठी आयेशानगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
चोरट्यांचे धाबे दणाणले
शहरातील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत नाशिक ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. अवघ्या दोन दिवसांत स्थानिक गुन्हे शाखेने दोन स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण १८ चोरीच्या दुचाकी जप्त करीत चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे दुचाकी चोरी करणाऱ्या टोळ्यांचे नेटवर्क उद्ध्वस्त झाले असून, आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.