मालेगाव : येथील मुख्य पोस्ट कार्यालयात रोजंदारी कर्मचार्याने सुमारे पावणेदोन कोटींचा अपहार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सहायक डाक अधीक्षक संदीप पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल फिर्यादीनुसार मुख्य पोस्ट कार्यालयात संगणकावर डाटा फिडिंगचे काम करण्यासाठी रोजंदारी तत्त्वावर आसीम रझा शहादत हुसेन (रा. मालेगाव) याची नियुक्ती करण्यात आली होती. या संशयिताने कार्यालयातील कर्मचार्यांचा विश्वास संपादन करून त्यांचे यूजर आयडी व पासवर्ड मिळविला. तसेच पेमेंट रक्कम दिलेल्या परंतु सॉफ्टवेअरमध्ये दिसत असलेल्या एकूण 159 विमा पॉलिसीची रक्कम जानेवारी 2022 ते डिसेंबर 2024 पर्यंत स्वत:च्या पोस्ट कार्यालयातील बचत खाते क्र. 4004421380 मध्ये एक कोटी 76 लाख 98 हजार 635 एवढी रक्कम जमा करून अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी संशयित आसीम रझा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक एन. जे. गायकर अधिक तपास करीत आहेत.