मालेगाव महापालिकेच्या इतिहासात तीन राजकीय घराण्यांचे सातत्याने वर्चस्व राहिले आहे.
दोन दशकांत झालेल्या आठ महापौरांपैकी सहा महापौर या घराण्यांतीलच होते.
सध्याच्या निवडणुकीतही पती-पत्नी, पुत्र-सून, भाऊ-भावजय असे अनेक नातेवाईक रिंगणात आहेत.
रौप्य महोत्सवाच्या उंबरठ्यावरही मालेगावच्या राजकारणात घराणेशाहीच केंद्रस्थानी आहे.
मालेगाव : प्रमोद सावंत
महापालिका रौप्य महोत्सवाच्या उंबरठ्यावर आहे. मनपाच्या दोन दशकांच्या व तत्कालीन नगरपालिकेच्या पाच दशकांच्या इतिहासात शहरातील राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या या संस्थेवर येथील पूर्व भागातील तीन राजकीय घराण्यांचे वर्चस्व राहिले आहे. या घराण्यांतील वेगवेगळ्या सदस्याने आलटून पालटून नगराध्यक्ष, महापौर व स्थायी समिती सभापती ही या संस्थेमधील सर्वोच्च महत्वाची पदे उपभोगली आहेत.
महापालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीतही या तीन घराण्यांवर निवडणूक केंद्रित झाली आहे. राजकीय घराणेशाहीची ही परंपरा यापुढेही सुरूच आहे. या तीन घराण्यांमध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते पद भूषविलेल्या निहाल अहमद, माजी आमदार तथा राज्य यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष या नात्याने राज्यमंत्री दर्जा प्राप्त झालेले रशीद शेख या दोन प्रमुख घराण्यांचा समावेश आहे. याउलट विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावत आमदार होण्याची संधी न मिळालेल्या पण सतत किंगमेकर राहिलेल्या मोहम्मद युनूस ईसा या तिसऱ्या राजकीय घराण्याचा बोलबाला आहे. दोन दशकांत महापालिकेत आठ महापौर झाले. त्यापैकी सहा महापौर या तीन घराण्यांमधीलच होते.
महापालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत अहमद यांच्या घराण्यातील त्यांच्या कन्या शानेहिंद निहाल अहमद व जावई तथा शानेहिंदचे पती मुश्तकिम डिग्निटी पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. गत सभागृहात शानेहिंद या विरोधी पक्षनेत्या तथा महागटबंधनच्या गटनेत्या होत्या. यापूर्वी निहाल अहमद यांनी नगराध्यक्ष व महापालिकानिर्मिती नंतर प्रथम महापौरपद भूषविले. त्यांच्या पत्नी साजेदा निहाल अहमद नगराध्यक्षा होत्या. महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापतिपद दोन वेळा भूषविण्याची संधी त्यांना मिळाली.
माजी आमदार रशीद शेख यांनी नगराध्यक्ष व महापौर पदही भूषविले. त्यांच्या पत्नी ताहेरा रशीद शेख या तर दोन वेळा महापौर झाल्या. पुत्र माजी आमदार आसिफ शेख यांनी अतिशय तरुण वयात महापौरपद मिळविले. या कुटुंबातील शेख यांचे बंधू खलील शेख शफी यांना स्थायी समिती सभापती पदाची संधी मिळाली होती.
या कुटुंबातील ताहेरा रशीद शेख, त्यांचे पुत्र इमरान शेख, आसिफ शेख यांचे काका जलील शेख शफी व बंधू खालीद शेख रशीद असे एकाच कुटुंबातील चार सदस्य यावेळी निवडणूक रिंगणात आहेत. मोहम्मद युनूस ईसा हे नगराध्यक्ष होते. त्यांचे पुत्र अब्दुल मलिक यांना महापौर पदाची संधी मिळाली.
आमदारांनी गिरविला घराणेशाहीचा कित्ता
मालेगाव मध्यचे विद्यमान आमदार मौलाना मुक्ती मोहम्मद इस्माईल यांनीही घराणेशाहीचा कित्ता गिरविण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी पुत्र हाफीज अब्दुल्ला मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांना प्रभाग १३ मधून निवडणूक रिंगणात उतरविले आहे. काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष एजाज वेग अजिज वेग हे स्वतः प्रभाग क्रमांक १८ मधून निवडणूक लढवित आहेत. त्यांनी पत्नी यास्मीन व भाऊ रियाज बेग अजिज बेग यांनाही याच प्रभागातून उमेदवारी दिली आहे. एजाज बेग यांनी यापूर्वी नगराध्यक्षपद आणि महापालिका स्थायी समितीचे सभापतिपद भूषविले आहे.
पश्चिम भागातील काही वलयांकित नावे
पश्चिम भागातील काही प्रमुख नेत्यांच्या नावाभोवती तत्कालीन नगरपालिका व महानगरपालिकेचे वलय आहे. भोसले घराणे त्यापैकी एक. या कुटुंबातील लक्ष्मण भोसले नगरसेवक होते. त्यांचे पुत्र राजेंद्र भोसले यांनाही हा मान मिळाला. पुतणे दीपक भोसले सर्वात तरुण नगराध्यक्ष झाले, तर अनंत भोसले यांना नगरसेवक म्हणून संधी मिळाली.
दीपक भोसले यांच्या पत्नी अॅड. ज्योती भोसले उपमहापौर होत्या. यावेळी या परिवारातील कोणीही निवडणूक रिंगणात नाही. संगमेश्वर भागातील माजी उपमहापौर सखाराम घोडके यांनी दोनदा उपमहापौरपद भूषविले. त्यांची वर्णी नगराध्यक्षपदी लागली होती. तीन वेळा उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यांची कन्या कल्पना वाघ या माजी नगरसेविका आहेत. यावेळी निवडणुकीत त्यांच्या पत्नी लता सखाराम घोडके व जावई विनोद वाघ हे नशीब आजमावित आहेत. त्याचप्रमाणे माधवराव वडगे नगराध्यक्ष होते.
त्यांचे बंधू दत्ता वडगे नगरसेवक होते. कॅम्प भागातील काळे व पवार परिवारही याच पंक्तीत मोडतो. विठ्ठलराव काळे, माजी नगराध्यक्ष होते. त्यांचे पुत्र सुनील काळे नगरसेवक, तर स्नुषा विजया काळे नगरसेविका होत्या. दिलीप पवार यांना मोठा राजकीय वारसा नव्हता. तथापि, ते नगरसेवक झाल्यानंतर त्यांच्या पत्नी जिजाबाई पवार नगरसेविका झाल्या. चुलतबंधू रवींद्र पवार नगरसेवक होते. यावेळी त्यांचे पुत्र विशाल पवार आणि पत्नी जिजाबाई पवार निवडणूक रिंगणात आहेत. सटाणा नाका भागातील सुनील व मदन गायकवाड हे बंधू नगरसेवक आहेत.