मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
शहरातील वीज वितरण व्यवस्थेतील त्रुटींमुळे शनिवारी (दि. ६) दोन गंभीर दुर्घटना घडल्या. विजेचा धक्का लागून लाइनमनचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुसऱ्या घटनेत १३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. या घटनांमुळे खासगी वीज वितरण कंपनी एमपीएसएलच्या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
नुमानीनगर गल्ली क्र. ४ येथील रहिवासी मोहम्मद इब्राहिम मोहम्मद युसूफ अन्सारी उर्फ गड्डू वायरमन (३२) हे शनिवारी (दि. ६) दुपारी १ च्या सुमारास संगमेश्वर परिसरातील कब्रस्तानातील वीज मीटर बदलण्यासाठी गेले होते. मीटर बदलल्यानंतर वीजजोडणी करण्यासाठी ते खांबावर चढण्याच्या तयारीत असताना मीटर पेटीत विद्युतप्रवाह सुरू असल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला.
यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे. मृतदेह विच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात आणण्यात आला होता. यावेळी नगरसेवक शेख खालिद हाजी, सामाजिक कार्यकर्ते शफीक शेख, खालिद एस. के. आणि झिया मुस्कान यांनी मृताच्या कुटुंबीयांना आवश्यक मदत उपलब्ध करून दिली.
इस्लामाबाद भागात घडलेल्या दुसऱ्या घटनेत मोहम्मद दानियाल मोहम्मद माजिद (१३) हा मुलगा क्रिकेट खेळत असताना त्याचा चेंडू घराच्या छतावर गेला. तो चेंडू आणण्यासाठी छतावर गेला असता, तेथून गेलेल्या ११ केव्ही वीजवाहिनीच्या संपर्कात आला. विजेच्या तारांचा धक्का लागल्याने तो गंभीर जखमी झाला. परिसरातील नागरिकांनी जवळील वीजपुरवठा खंडित केल्याने त्याचा जीव वाचला.
सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोन्ही घटनांनंतर नगरसेवक खालीद शेख, शफीक शेख, खालिद एस. के. आणि झिया मुस्कान यांनी एमपीएसएलच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरात यापूर्वीही वीज धक्क्यामुळे नागरिक व जनावरांचे बळी गेले असून, वारंवार तक्रारी करूनही कंपनीकडून प्रभावी उपाययोजना केलेल्या नाहीत, असा आरोप त्यांनी केला. मृत मोहम्मद इब्राहिम यांच्या कुटुंबीयांना आणि जखमी दानियालला योग्य आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलनाचा इशारा नगरसेवक खालीद शेख यांनी दिला.