मालेगाव : मालेगाव - मनमाड महामार्गावरील वऱ्हाणे गावाजवळ सोमवारी (दि. 19) पहाटे पिकअप व खासगी ट्रॅव्हल्स यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. पुण्याकडून मालेगावच्या दिशेने येणारी खासगी बस आणि समोरून येणारी पिकअप यांची जोरदार धडक झाली. अपघाताची तीव्रता इतकी प्रचंड होती की, पिकअप वाहन थेट बसमध्ये घुसल्याने तिचा अक्षरशः चुराडा झाला तर ट्रॅव्हल्सच्या पुढील भागाचेही मोठे नुकसान झाले.
मृतांमध्ये मालेगाव येथील अमनपुरा भागातील सत्तार खान मोहंमद खान (वय 39), याकूब शेरू खान (27), शेख अताऊर रहेमान आबीद (39) यांच्यासह बसचा क्लिनर सतिश मन्साराम गोऱ्हे (30, रा. सेंधवा, मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे. तर अपघातात बसचालकासह पिकअपमधील एक जण जखमी झाला आहे. त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिकअप मनमाडच्या दिशेने जात असताना समोरून येणारी खासगी बस यांच्यात वऱ्हाणे गावाजवळ समोरासमोर धडक झाली. यात मालेगावातील तिघे युवक पुणे येथे कॉलीन विक्रीसाठी जात होते. पिकअपच्या पुढील सीटवर तिघेही बसले असल्याने अपघातात त्यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.