मालेगाव: मालेगाव येथे 2008 साली झालेल्या बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज, गुरूवारी (दि.३१) विशेष एनआयए न्यायालयाने जाहीर केला. या खटल्यातील ७ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या निकालाचा हिंदू संघटनांनी जल्लोष साजरा केला, दरम्यान फटाके फोडण्यावरून मालेगावातील फुले चौकात तणाव निर्माण झाला.
मालेगाव शहरातील फुले चौकात गुरूवारी (दि.३१)मोठा गोंधळ उडाला. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष सुटका झाल्याने हिंदू संघटनांनी फटाके फोडण्याचा आग्रह धरला. यावेळी पोलिसांनी त्यास विरोध केल्याने हिंदू संघटना आणि पोलिस यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
फुले चौकात हिंदू संघटनेचे कार्यकर्ते पारंपरिक पद्धतीने फटाके फोडण्याचा आग्रह धरत होते. सार्वजनिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी फटाके फोडण्यास विरोध केला. यावेळी दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक झाली. काही वेळेस झटापटीचे प्रसंगही घडले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला. या घटनेमुळे फुले चौक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असले, तरी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच स्थानिक प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
मालेगावातील मुस्लीमबहूल भागात एका धार्मिक स्थळाबाहेर 29 सप्टेंबर 2008 रोजी एका दुचाकीमध्ये झालेल्या स्फोटात 6 जणांचा मृत्यू तर 101 जण जखमी झाले होते. या प्रकरणाची चौकशी सुरुवातीला ATS कडून आणि नंतर NIA कडून करण्यात आली. या प्रकरणानंतर पहिल्यांदाच 'हिंदू दहशतवाद' पसरवण्याचा आरोप करण्यात आला होता.