मालेगाव (नाशिक): बनावट जन्म दाखले प्रकरणाला आता वेगळे वळण लागले असून, या प्रकरणाचा तपास विशेष पोलिस पथकाकडून सुरू असतानाच शुक्रवारी (दि. 25) अंमलबजावणी संचालनालय (ईडी) व आयकर पथकाने शहरात सहा ठिकाणी छापेमारी केली.
विशेष पोलिस पथकाकडून शुक्रवारी (दि. 25) सकाळी 10.30 ते सायंकाळी 4.30 पर्यंत ही कारवाई सुरू होती. यात एका मनपा कर्मचाऱ्याच्या घरातून जन्म दाखले जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अद्यापपर्यंत पथकाकडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगाव येथे बांगलादेशींना बनावट जन्म दाखले दिल्याचा आरोप करत सखोल चौकशीची मागणी केल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून या प्रकरणी विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) चौकशी सुरू आहे. यात आतापर्यंत जवळपास 35 ते 40 संशयितांवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान आता ईडी व आयकर विभागाकडून चौकशी सत्र सुरू झाले आहे. यातूनच संशयितांच्याही घरांवर छापेमारी करण्यात आली आहे. यात शहरातील रौनकाबाद भागातील गल्ली नंबर 7 येथील महापालिकेचे जन्म- मृत्यू नोंदणी विभागातील कर्मचारी तव्वाब शेख यांच्यासह आयेशानगर येथील गजाला परवीन यांच्या घरांवरही छापा टाकण्यात आला.
या कारवाईत शेख यांच्या घरात जन्म व मृत्यू दाखले आढळले असून, ही कागदपत्रे ईडीने ताब्यात घेतल्याचे समजते. तसेच शेख यांच्या बँक शाखेतील खाते क्रमांकाच्या व्यवहारांची तपासणी करण्यात येत आहे. याप्रकरणी ईडी व आयकर विभागाने पंचनामा करून प्रत त्यांच्या कुटुंबीयांना दिली आहे, तर आयेशानगरमधील गजाला परवीन यांच्या सासरच्या घरीही छापा टाकण्यात आला. त्यांच्या घर झडतीत काहीही आढळलेले नाही. तव्वाब शेख व गजाला परवीन यांच्या कुटुंबीयांनी तपास यंत्रणेच्या अधिकार्यांना पूर्णपणे सहकार्य केले. या व्यतिरीक्त मोहमंद अमीन मोहमंद हसन, निवत्ती बागुल, भगिरथ चौधरी आणि शंकर महाजन यांच्या घरावरही छापेमारी करण्यात आली. छाप्यात केंद्रीय सुरक्षा दलाचे अधिकारी, कर्मचारी व स्थानिक पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
या प्रकरणात तत्कालीन तहसीलदार नितीन देवरे, विद्यमान नायब तहसीलदार संदीप धारणकर यांना निलंबित करण्यात आलेले आहे, तर जवळपास 35 ते 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे.
जन्म दाखले प्रकरणात आतापर्यंत विशेष पोलिस पथकाच्या चौकशीत एकही रोहिंग्या किंवा बांगलादेशी नागरिक आढळलेला नाही. त्यामुळे या चौकशीत तथ्य नाही. मालेगाव शहराला बदनाम करण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप माजी आ. आसिफ शेख यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. तसेच मनपा जन्म दाखला विभागातील कर्मचारी तव्वाब शेख यांच्या घरी जन्म व मृत्यू दाखले आढळले असले, तरी या दाखल्यांची नोंद कब्रस्तान या ठिकाणी ठेवावी लागते. तसेच नागरिकांना सहज दाखले उपलब्ध व्हावेत यासाठीही शेख यांनी दाखले घरी ठेवले असतील, असा दावा माजी आ. शेख यांनी केला आहे.