मालेगाव बॉम्बस्फोटात वडापाव घेण्यासाठी घराबाहेर गेलेली दहा वर्षांची फरहीनही बळी पडली Nashik Latest News
नाशिक

Malegaon Blast Case | "कौन ढुंडे जवाब दर्द का !"

पीडितांच्या कुटुंबीयांचा आक्रोश : जमेतुल- उलेमा, पीडित सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार

पुढारी वृत्तसेवा

  • वडापाव घेण्यासाठी गेलेली चिमुकली बॉम्बस्फोटाची बळी

  • सतराशे वर्षे उलटून गेल्यानंतर न्यायालयीन निर्णयाने केला अपेक्षाभंग

  • सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार : चिमुकलीच्या वडीलांचा अंगावर काटा आणणारा प्रतीप्रश्न

The Malegaon Blast Case verdict was disappointing.

मालेगाव (नाशिक) : रमजानच्या अखेरच्या पर्वात झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत वडापाव घेण्यासाठी घराबाहेर गेलेली दहा वर्षांची फरहीनही बळी पडली. पानाचा आस्वाद घेऊन मुंबईला जाण्याच्या तयारीत असलेले रफीक शेख मुस्तफा यांचाही जीवनप्रवास थांबला. या घटनेला आता सतराशे वर्षे उलटून गेली असून, कुटुंबीयांचे न्यायालयीन निर्णयाकडे लक्ष लागून होते. मात्र, निकाल अपेक्षाभंग करणारा ठरला. ‘आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, पण आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार?’ असा सवाल फरहीनचे वडील लियाकत शेख यांनी कातर स्वरात उपस्थित केला. त्यांनी मुलीचा फोटो दाखवत ‘हमे इन्साफ नहीं मिला’ अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली.

मुलीला पाहू देखील दिले नाही....

पूर्व भागातील नागरिकांमध्ये निकालाबद्दल संतप्त प्रतिक्रिया आहेत. मात्र, त्या व्यक्त करण्यास ते धजावत नव्हते. भिक्कू चौकात काही तरुण ‘ये तो होना ही था’ असे म्हणत संतापाला वाट मोकळी करून देत होते. न्यायालयापेक्षा ‘एनआयए’वर त्यांचा रोष होता. पोलिसांनी या भागात चोख बंदोबस्त ठेवला होता.

लियाकत शेख म्हणाले, मी भिकू चौकात मागेच राहतो. बॉम्बस्फोट झाला तेव्हा मी घरातच होतो. त्यावेळी जोराचा आवाज आला. माझ्या घराच्या पत्र्यांवरही छर्रे उडाले. मी घटनास्थळी गेलो तर मोठी धावपळ उडाली होती. गर्दीतच कोणीतरी यात एक मुलगीही ठार झाल्याचे सांगितले. ती माझीच मुलगी होती, ती घरून वडापाव आणायला गेली होती. मी धावतच फरहान हॉस्पिटल गाठले. त्यानंतर पुन्हा वाडिया रुग्णालयात गेलो. मात्र मला मुलीला पाहू दिले नाही. काही काळानंतर मृतदेह पाहायला मिळाला. आम्हाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. ‘सबको सबूत के साथ पकडा था, फिर भी निकाल गलत हुआ’ अशी मत नोंदवत त्यांनी आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागू, असे सांगितले

न्यायालयाने केला भ्रमनिरास

निसार सय्यद अहमद यांचा सतरा वर्षाचा शाळकरी मुलगा सय्यद अजहर अहमद हा नमाज पठण करून परतत होता. तो चौकात आला अन् बॉम्बस्फोटाचा बळी ठरला. आम्ही १७ वर्षे न्यायाची प्रतीक्षा केली. आज आमचा भ्रमनिरास झाला आहे. मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयातून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे असे ते म्हणाले. अशीच भावना अन्य पीडितांच्या आप्तेष्टांनी व्यक्त केली.

एकूणच पूर्व भागात विविध चौकाचौकात या निकालाची चर्चा होती. जगण्याची भ्रांत असलेले व हातावर पोट असलेला मजूरवर्ग मात्र आपापल्या कामात व यंत्रमागाच्या खडखडाटात गुरफटला होता. त्यांना आठवड्यातील कामाचा हिशोब व जुम्माचा पगार किती मिळेल याचीच चिंता होती.

सहनेवाले कमाल करते है....

या सर्व गदारोळात एका शायरीतील जाणकारांने हा शेर ऐकवला.

‘कहने वालो का कुछ नहीं जाता, सहनेवाले कमाल करते है.

कौन ढुंडे जवाब दर्द का

लोग तो बस सवाल करते है.’

Nashik Latest News

तपास यंत्रणांवर रोष

‘जमेतुल उलेमा’चे मौलाना अब्दुल कय्युम म्हणाले, घटना तर घडली. आरोपी पुराव्यानिशी मिळाले. गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे होती. तपास यंत्रणांच्या निष्काजीपणामुळे हा निकाल आला. अद्यापही आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून न्यायाची अपेक्षा बाळगून आहोत. जमेतुल उलेमा सर्वोच्च न्यायालयात जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT