लासलगाव : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र महिलांना योजनेचे प्रमाणपत्र प्रदान करताना उपमुख्यमंत्री अजित पवार.  (छाया : राकेश बोरा)
नाशिक

Maji Ladki Bahin Yojna | लाडकी बहीण योजनेसाठी ४५ हजार कोटींची तरतूद

उपमुख्यमंत्री अजित पवार : लाडकी बहीण संवाद मेळावा

पुढारी वृत्तसेवा

लासलगाव : साडेसहा लाख कोटींचा राज्यात अर्थसंकल्प असून, यात महिलांना सक्षम बनविण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. यासाठी अर्थसंकल्पात ४५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. तसेच महायुती सरकारने जनतेच्या हितासाठी सुरू केलेल्या योजना अविरतपणे सुरूच राहतील, असा विश्वास व्यक्त केला. (There is a budget of six and a half lakh crores in the state and the 'Maji Ladaki Bahin Yojana' has been started to empowerment of women)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या जनसन्मान यात्रेत येथील बाजार समिती परिसरात लाडकी बहीण संवाद मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. मंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, रूपाली चाकणकर, सूरज चव्हाण, माजी खा. समीर भुजबळ, आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

मंत्री पवार म्हणाले, महायुती सरकार महिलांना योजनांच्या माध्यमातून लाभ मिळून देत सक्षम करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे जनतेची शक्ती आमच्या पाठीशी उभी आहे. जनतेचे या पाठबळावरच जनसन्मान यात्रा सुरू केली आहे. तसेच लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या दोन महिन्यांचे पैसे देण्यासाठी ६ हजार कोटी रुपयांची फाइल माझ्यासमोर आली. त्यावेळी महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून आपण त्यावर तत्काळ स्वाक्षरी केली. विरोधक ही योजना पुढे चालणार नसल्याचे सांगत आहेत. मात्र, महायुतीचे सरकार आल्यास ही योजना पुढील पाच वर्षे सुरू ठेवण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच सर्व जाती-धर्मांना न्याय देण्याचे काम महायुती सरकार करत असल्याचे सांगितले. नाशिकला पिण्याच्या पाण्यासाठी किकवी प्रकल्पाला मंजुरी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. वैशाली पवार, ऐश्वर्या जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. सभेच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चांदीची राखी भेट देत महिलांनी औक्षण केले. यावेळी विष्णुपंत म्हैसधुने, पंढरीनाथ थोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, वसंत पवार, भाऊसाहेब भवर, प्रेरणा बलकवडे, ज्ञानेश्वर जगताप, गणेश डोमाडे, सरपंच सचिन दरेकर आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांसाठी मोफत वीज

कांदा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांदा निर्यातबंदी करू नये, असा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. शेतकरी बांधवांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुधाला ५ रुपये अनुदान आपण जाहीर केले आहे. या योजनांचा फायदा जनतेला होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पवार यांनी सांगितले.

वचने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध : भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांनी महायुती सरकारने महिला, शेतकरी, युवक, विद्यार्थिनी यांच्यासह विविध घटकांसाठी ज्या योजना सुरू केल्या आहेत. त्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम या यात्रेच्या माध्यमातून होत असल्याचे सांगत सरकारने दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

राजकीय भाष्य टाळत केवळ याेजनांचा प्रचार

निफाड : राष्ट्रवादी कॉग्रेसने काढलेली जनसन्मान यात्रा शुक्रवारी (दि. ९) निफाडमध्ये दाखल होऊन येथे देखील मेळावा पार पडला. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकीय भाष्य कटाक्षाने टाळत केवळ शासकीय योजनांच्या प्रचारावर भर दिला. लाडकी बहीण योजना ते जिल्हा बँकेपर्यंतच्या तरतुदींविषयी माहिती देताना त्यांनी ही सर्व उद्दीष्टे साध्य करावयाची असल्यास सत्तेची सूत्रे आमच्याच हाती सोपवायला हवी, अशा शब्दात जनसमुदायाला साद घातली.

आपण कोणतीही योजना ही हवेतल्या गप्पा म्हणून मांडत नाही, त्यासाठी संपूर्ण अभ्यास करूनच निर्णय घेतो, असे सांगत उपमुख्यमंत्री पवार यांनी शासनाने सुरु केलेल्या योजनांबाबत आश्वस्त करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना जनतेपर्यंत शासनाचा दृष्टीकोन पोहोचवण्याचे आवाहन केले. अडचणीत असलेल्या राज्यातील जिल्हा बँकांना उर्जितावस्थेत आणण्यासाठी शासन गंभीर असून नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेला बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती बँकेप्रमाणे काही मदत करता येते की काय याचा विचार करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कांदा निर्यातबंदीवरही त्यांनी प्रांजळ कबुली दिली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विरोधकांना त्यांची जागा दाखविण्यासाठी अजितदादांच्या पाठीमागे उभे राहण्याचे जनतेला आवाहन केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT