भोकणी : गावात दुतर्फा वृक्षारोपण केल्याने हिरवाईने नटलेला परिसर (छाया : संदीप भोर)
नाशिक

Majhi Vasundhara Abhiyan Nashik : भोकणी ग्रामपंचायतीला ५० लाखांचे बक्षीस जाहीर

पुढारी वृत्तसेवा

सिन्नर : तालुक्यातील भोकणी ग्रामपंचायतीला माझी वसुंधरा अभियानांतर्गत ५० लाख रुपयांचे तिसऱ्या क्रमांकाचे राज्यस्तरीय बक्षीस जाहीर झाले आहे.

भोकणी ग्रामपंचायतीने सरपंच अरुण वाघ यांच्या नेतृत्वाखाली ४.० माझी वसुंधरा स्पर्धेत सहभाग घेत पर्यावरणपूरक गाव करण्यासाठी अनोखा प्रयत्न केला. स्वच्छता, वृक्षारोपण, पाणी व्यवस्थापन, बंदिस्त गटारी, रस्ते, सुशोभीकरण, रंगरंगोटी, नैसर्गिक प्रतिकृती, महिला सबलीकरण आदी विविध उपक्रम राबविण्यात आलेल्या ग्रामपंचायतीला ग्रामविकास मंत्रालय भारत सरकारच्या वतीने बक्षीस देऊन गौरवण्यात येते. महाराष्ट्र राज्यात भोकणी ग्रामपंचायतला तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस नुकतेच जाहीर झाले आहे.

सरपंच, ग्रामसेवक, पर्यावरणदूत, अंगणवाडी सेविका, महिला बचतगट सदस्या, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, मनेरेगा अंतर्गत येणारे मजूर यांच्या श्रमदानाने गाव व परिसरात व रस्त्याच्या दुतर्फा बाजूने वृक्षलागवड करून त्याचे संगोपन व संवर्धन करण्यात आले आहे. भोकणी गाव हे हिरवाईने नटलेले असून, झाडाचे गाव व ऑक्सिजन तयार करणारे गाव म्हणून जिल्ह्यात नावारूपाला आलेले आहे.

वसुंधरा अभियान स्पर्धेत भोकणी ग्रामपंचायतने सहभाग घेतला. लोकसहभाग, पर्यावरणदूत, ग्रामविकास मंचचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य यांना सोबत घेऊन गाव परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करून त्याचे संगोपन केले. विविध उपक्रम राबवून अंमलात आणले असून, गावाचे सौंदर्य व विकासासाठी प्रयत्न केले. स्वतःच्या उत्पन्नाला तिलांजली देऊन शेततळ्यातील व विहिरीचे पाणी वृक्ष जतन करण्यासाठी वापरले. पर्यावरणपूरक व सुंदर गाव करण्याचा प्रयत्न केला.
अरुण वाघ, सरपंच, भोकणी ग्रामपंचायत, सिन्नर, नाशिक.

गावात विविध पर्यावरणपूरक उपक्रम

गावात नक्षत्र बाग, सैनिक सन्मान बाग, नैसर्गिक धबधबा, पक्षी उद्यान, तुलसी वन, जांभूळ वन, मसाले वन, महिला संसद भवन, कमळ बाग, जिवामृत बेड प्रकल्प, गांडूळ खत प्रकल्प, हायटेक स्मशानभूमी, पर्यावरणपूरक हौदनिर्मिती, धोबी घाट, विशेष म्हणजे ५ हजार वृक्षांची आमराई उपक्रम राबवले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा व हिरवाईने नटलेला परिसर असून पर्यटकांची रेलचेल भोकणी गावात असते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT