नाशिक : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना विविध मागण्यांचे निवेदन देताना आ. सत्यजित तांबे. pudhari news network
नाशिक

नाशिक-पुणे रेल्वेचा मूळ मार्ग कायम ठेवा; आमदार तांबेंची रेल्वे मंत्र्याकडे मागणी

आ. तांबेंची रेल्वे मंत्र्याकडे मागणी, नाशिक रोड रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण करा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : गेल्या अनेक वर्षांपासून उत्तर महाराष्ट्रातील अनेक रेल्वे प्रकल्प अजूनही पूर्ण झालेले नाहीत. या प्रकल्पाबाबत आमदार सत्यजित तांबेंनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत निवेदन दिले आहे. नाशिक-पुणे सेमी हायस्पीड, नगर-पुणे रेल्वे प्रकल्प, नाशिक रोड रेल्वे स्टेशन सुशोभीकरण आणि वंदे भारत ट्रेनची गती आणि स्वच्छता याबाबतची मागणी आ. तांबे यांनी ‌‌वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे, नाशिक-पुणे सेमी-हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मूळ मार्गात बदल करण्यात आला असून, तो संगमनेर, सिन्नर आणि नारायणगाव या पूर्वीच्या मार्गाऐवजी आता शिर्डी येथून जाण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, या प्रकल्पाला विलंब होत आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी कोणी करायची यावर चर्चा सुरू आहे. २५ ते ३० टक्के भूसंपादन प्रक्रियादेखील पूर्ण झाली असून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला देण्यात आला आहे. अशा वेळी प्रकल्पात बदल करणे घातक आहे. त्यामुळे महारेलसोबत प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू ठेवून पूर्वी ठरल्याप्रमाणे मूळ मार्ग कायम ठेवा. त्याचबरोबर नगर-पुणे रेल्वे प्रकल्प सध्या दौंडमधून असल्याने नगर आणि पुणे दरम्यान प्रवास करण्यासाठी लागणाऱ्या नियमित वेळेपेक्षा दुप्पट वेळ असल्याने नगरच्या नागरिकांना या रेल्वेमार्गाचा कोणताही फायदा नाही. ट्रेनचा मार्ग बदलून प्रकल्पाला वळसा न घालता सरळ दिशेने नेण्याची नागरिकांची मागणी आहे. या रेल्वे प्रकल्पात मंत्री वैष्णव यांनी स्वतः लक्ष घालून हस्तक्षेप करण्याची मागणी आमदार तांबेंनी केली.

महाराष्ट्रातील रेल्वे जाळ्यापैकी नाशिक हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. नाशिक रेल्वे स्थानकाच स्वच्छतेचा प्रश्न कायम असून रेल्वे स्थानक अद्ययावत करणे आवश्यक आहे. नाशिक रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्थानकावर नियमित स्वच्छता मोहीम राबवावी आदी मागणी आमदार तांबेंनी केली आहे.

देवळाली-भुसावळ मेमू आठलाच सोडा

कोविड काळात चाळीसगाव, पाचोरा रेल्वे स्थानकावर थांबणारी महाराष्ट्र एक्सप्रेस चाळीसगावला सकाळी ७:१२ वाजता पोहोचणारी गाडी सध्या स्थानकावर पहाटे ५:५८ वाजता पोहोचते. शिवाय, देवळाली भुसावळ मेमू ट्रेनची वेळ पूर्वी सकाळी ८:०० वाजता होती, परंतु आता ही ट्रेन ९:४५ वाजता येते. लवकर उठून निघावे लागत असल्याने लोकांना त्रास असल्याने महाराष्ट्र एक्स्प्रेस आणि देवळाली भुसावळ या दोन्ही मेमू गाड्यांच्या वेळा पूर्वीप्रमाणे पूर्ववत कराव्यात, असे म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT