Nashik Municipal Corporation Pudhari News Network
नाशिक

Nashik Municipal Corporation | नाशिक मनपा विषय समित्यांवर महायुतीचे वर्चस्व! पाचही समित्यांच्या सभापती-उपसभापतींची बिनविरोध निवड

Nashik Municipal Corporation | भाजपकडे महिला बालकल्याण, विधी व शिक्षण; शिवसेनेकडे वैद्यकीय साहाय्य, राष्ट्रवादी काँग्रेसकडे शहर सुधारणा समिती

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अल्पमतातील विरोधकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्यामुळे महिला बालकल्याणसह पाचही विषय समित्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीच्या पदरात पडल्या आहेत. या समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांची निवड बिनविरोध पार पडली. भाजपकडे महिला बालकल्याण, विधी व शिक्षण, शिवसेनेकडे वैद्यकीय साहाय्य, तर राष्ट्रवादी काँग्रेसला शहर सुधारणा समितीचे सभापतीपद मिळाले.

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर महापौर व उपमहापौर निवडीपाठोपाठ विषय समित्यांच्या निवडणुका घेणे क्रमप्राप्त होते. मात्र, तब्बल नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर या विषय समित्यांच्या निवडणुकीला मुहूर्त लागला. नगरसचिव विभागाच्या प्रस्तावावर विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी विषय समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला.

त्यानुसार दि. ८ व ९ ऑक्टोबर रोजी विषय समित्यांच्या सभापती व उपसभापतीपदाच्या निवडणुका विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहेत. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवार (दि. ६) पर्यंत होती.

या पाचही समित्यांवर सत्तारूढ भाजप महायुतीचे वर्चस्व आहे. ९ सदस्य समित्यांवर सत्तारूढ भाजपचे प्रत्येकी पाच, शिवसेना शिंदे गटाचे दोन, तर विरोधक शिवसेना (उबाठा) व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रत्येकी एक सदस्य नियुक्त करण्यात आला. विधी समितीत राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष नगरसेवकाला संधी मिळाली आहे. पाचही समित्यांवर सत्तारूढ गटाचे वर्चस्व असल्यामुळे विरोधकांना एकाही समितीचे सभापतीपद, उपसभापतीपद मिळण्याची संधी नव्हती.

त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत विरोधकांकडून एकही अर्ज दाखल झाला नाही. भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाचही समित्यांवर प्रत्येकी एका उमेदवाराने अर्ज दाखल केल्यामुळे या समित्यांच्या सभापती व उपसभापती पदाची निवड बिनविरोध झाली. नगरसचिव संजय नेरकर यांनी अर्ज स्वीकारले असून, निवडणुकीची केवळ औपचारिक घोषणा होणे आता शिल्लक आहे.

महायुतीच्या समन्वयातून समित्यांना सक्षम नेतृत्व:

मनपातील विषय समित्या या शहराच्या विकास प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाच्या समित्या आहेत. विधी, शिक्षण, महिला व बालकल्याण, आरोग्य आणि शहर सुधारणा या पाचही क्षेत्रांचा थेट संबंध नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी आहे. त्यामुळे समित्यांच्या माध्यमातून नागरिकाभिमुख निर्णय घेणाला प्राधान्य देण्यात येईल. महायुतीतील सर्व घटक पक्षांना सामावून घेऊन सर्वांना योग्य प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. समित्यांच्या माध्यमातून नाशिक शहराच्या विकासाला अधिक गती देणे आणि नागरिकांना प्रभावी सेवा उपलब्ध करून देणे हेच प्रमुख उद्दिष्ट आहे.
— हिमगौरी आहेर-आडके, महापौर

भाजपकडे तीन समित्या, पाचही समित्यांचे उपसभापती:

03 भाजप | 01 शिवसेना | 01 राष्ट्रवादी

पाचही विषय समित्यांपैकी भाजपकडे तीन, तर शिवसेना व राष्ट्रवादीच्या वाट्याला प्रत्येकी एक समिती आली आहे. भाजपला महिला व बालकल्याण, विधी व शिक्षण समितीचे सभापतीपद मिळाले आहे. शिवसेनेला वैद्यकीय साहाय्य, तर राष्ट्रवादी काँग्रेसला शहर सुधारणा समितीचे सभापतीपद मिळाले आहे. या पाचही समित्यांचे उपसभापतीपद मात्र भाजपने राखले आहे. उपसभापती पदावर मित्रपक्षांना संधी मिळाली नाही.

समिती व नवनिर्वाचित सभापती-उपसभापती:

  1. महिला व बालकल्याण समिती:

    • कोमल मेहरोलिया (सभापती)

    • चित्रा तांदळे (उपसभापती)

  2. शहर सुधारणा समिती:

    • जागृती गांगुर्डे (सभापती)

    • जयंत जाचक (उपसभापती)

  3. वैद्यकीय साहाय्यक व आरोग्य समिती:

    • पूनम महाले (सभापती)

    • सतीश निकम (उपसभापती)

  4. विधी समिती:

    • जुई शिंदे (सभापती)

    • अंकिता शिंदे (उपसभापती)

  5. शिक्षण समिती:

    • शरद मोरे (सभापती)

    • सोनाली भंदुरे (उपसभापती)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT