नाशिक : महावितरण विभागाचा अजब कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. डिजिटल मीटर बसवून नागरिकांची फसवणूक केल्याच्या तक्रारी आधीच वाढत असताना विंचूर गवळी येथील शेतमजूर माधव दत्तराव थोरात यांना तब्बल १५ लाख ७६ हजार ९६० रुपयांचे विजेचे बिल देण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या अंगावर काटा आला आहे.
थोरात हे सुतारकाम करत संसार चालवतात. एवढ्या प्रचंड रकमेचे बिल आल्याने त्यांचा अक्षरशः धक्का बसला. एवढेच नव्हे तर पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका मूक व्यक्तीसही जवळपास पावणेदोन लाखांचे बिल देण्यात आले आहे. माडसांगवी, आडगाव परिसरात ग्राहकांनाही महावितरणच्या सीसीओ अँड एम बिलिंग विभागाकडून अव्वाच्या सव्वा बिलिंग केल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहे. गेल्या तीन चार महिन्यांपासून सुरू असलेल्या या गैरव्यवहारामुळे नागरिकांत संताप निर्माण झाला आहे. ग्राहक वारंवार जेलरोडच्या उपविभागीय कार्यालयात फिरत असूनही बिल दुरुस्ती होत नाही.
मी सुतारकाम करणारा माणूस आहे. मला दर महिन्याला ४०० ते ५०० रुपये बिल येते. आता १५ लाखाहून अधिक बिल आले आहे. एवढे बिल भरायचे म्हणजे माझे घर विकूनही भरल्या जाणार नाही. मी जेलरोड येथे जाऊन आलो. पण अधिकारी बोलले की कमी होईल. पण अजूनही काहीच झाले नाही.माधव थोरात, विंचूर गवळी, सिन्नर, नाशिक
बिलिंग अधिकारी हर्षल काटे व त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून ‘करू, बघू, पुढच्या महिन्यात होईल’ अशी उडवाउडवीच्या प्रतिक्रिया मिळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. संतप्त गावकऱ्यांनी सर्व चुकीची बिले तत्काळ दुरुस्त न झाल्यास महावितरण विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.