Mahavitran Fake Job Alert  
नाशिक

Mahavitran Fake Job Alert | महावितरणमध्ये 23 हजार नोकऱ्यांचे खोटे आमिष; सोशल मीडियावर सुरू असलेल्या फसवणुकीच्या प्रकाराने उडाली खळबळ

Mahavitran Fake Job Alert | सोशल मीडियावर फसवणुकीचा प्रकार; कोणतीही परीक्षा नाही, थेट नियुक्तीचे कारण देत तरुणांची दिशाभूल

पुढारी वृत्तसेवा

नाशिक (पुढारी वृत्तसेवा):

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना हेरून त्यांच्या स्वप्नांचा गैरफायदा घेण्याचा प्रकार आता सोशल मीडियावर उघडपणे सुरू झाला आहे. महावितरणमध्ये तब्बल २३ हजारांहून अधिक पदांची भरती सुरू असल्याचा दावा करणाऱ्या बनावट जाहिरातींचा सध्या सोशल मीडियावर सुळसुळाट झाला आहे.

विशेष म्हणजे, कोणतीही परीक्षा नाही, मुलाखत नाही, थेट नियुक्ती आणि त्यातही दहावी उत्तीर्ण उमेदवारांना हजारो रुपयांचे वेतन, असे आकर्षक आमिष दाखवून तरुणांची दिशाभूल केली जात आहे. मात्र, या जाहिराती पूर्णपणे खोट्या असून, त्यांचा महावितरणशी कोणताही संबंध नसल्याचा खुलासा महावितरण कंपनीने केला आहे.

नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या बेरोजगार तरुणांना लक्ष्य करून अशा जाहिराती प्रसारित केल्या जात असल्याने फसवणुकीचा धोका वाढला आहे. महावितरणमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती सुरू असल्याचे भासवून उमेदवारांना संशयास्पद ऑनलाइन लिंककडे वळवले जात आहे. त्यामुळे नोकरीच्या आमिषाला बळी पडून वैयक्तिक माहिती किंवा अन्य तपशील देण्यापूर्वी उमेदवारांनी सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

महावितरणने स्पष्ट केले आहे की, कंपनीतील कोणत्याही पदाच्या भरतीसंदर्भातील अधिकृत जाहिरात, पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया आणि वेळोवेळी प्रसिद्ध होणारी माहिती केवळ www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावरच उपलब्ध करून दिली जाते.

अधिकृत संकेतस्थळावर खातरजमा करावी!

नोकरीच्या आमिषाने फसवणूक होऊ नये, यासाठी तरुणांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. २३ हजार पदांच्या भरतीचा दावा करणाऱ्या जाहिरातींची अधिकृत संकेतस्थळावर खातरजमा केल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
संकेतस्थळावर प्रसिद्ध न झालेल्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची लिंकदेखील महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावरच करून दिली जाते. त्यामुळे सोशल मीडियावरून आलेल्या अनोळखी किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळावे. कोणत्याही जाहिरातीची सत्यता तपासल्याशिवाय अर्ज करू नये, असे कंपनीने बजावले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT