नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या अनुषंगाने शहरात विविध रस्त्यांचे रुंदीकरण आणि उंचीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, या कामांमुळे महापारेषणच्या अतिउच्च दाबाच्या (ईएचव्ही) वीजवाहिन्यांखालील जमिनीपासूनचे सुरक्षित अंतर कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यामुळे उंच वाहनांचा वीजवाहिन्यांना स्पर्श होऊन अपघात घडण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका असल्याचे महापारेषणने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्यांची उंची वाढविताना आवश्यक तांत्रिक निकष, सुरक्षित अंतर आणि मार्गाधिकार (राइट ऑफ वे) कायम ठेवण्याची सूचना महापारेषणने महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे.
महापारेषणच्या आडगाव संचार विभागाचे कार्यकारी अभियंता ललितकुमार पाटील यांनी यासंदर्भात महापालिकेला पत्र पाठविले आहे. शहरातील पपया नर्सरी ते एक्स्लो पॉईंट, एज फिटनेस हबजवळील परिसर, नंदिनी ब्रीज, सातपूर-अंबड लिंक रोड तसेच गंगापूर ते बारदान फाटा आणि सुला चौक परिसरात रस्त्यांची उंची वाढविणे व वीज मनोऱ्यांचे स्थलांतर करण्यासंदर्भातील कामे सुरू आहेत.
सिंहस्थाच्या कामांतर्गत रस्त्यांची पातळी वाढविल्यास संबंधित ठिकाणांवरील १३२ केव्ही आणि २२० केव्ही अतिउच्च दाबाच्या वीजवाहिन्यांखालील जमिनीपासूनचे सुरक्षित अंतर कमी होऊ शकते. विशेषतः उंच कंटेनर ट्रक आणि अन्य अवजड वाहनांमुळे वीजवाहिन्यांना स्पर्श होण्याची शक्यता आहे. परिणामी, वीजपुरवठा खंडित होण्यासह गंभीर अपघात घडण्याचा धोका असल्याचे महापारेषणने निदर्शनास आणून दिले आहे.
महापारेषणची परवानगी घ्यावी लागणार
रस्त्यांच्या उंचीकरणाची कामे सुरू करण्यापूर्वी महापारेषणच्या संबंधित कार्यालयाशी समन्वय साधणे आवश्यक असल्याचे महापारेषणने पत्रात म्हटले आहे. या कामांसाठी आवश्यक कागदपत्रे आणि तांत्रिक अंदाजपत्रक तयार करण्यासंबंधीची माहिती वारंवार पत्रव्यवहार करूनही महापालिकेकडून प्राप्त झालेली नसल्याने पुढील तांत्रिक कार्यवाहीला विलंब होत असल्याचे महापारेषणने पत्रात स्पष्ट केले आहे. त्यामुळे आवश्यक माहिती व कागदपत्रे तातडीने उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे.
तर महापालिका जबाबदार...!
रस्त्यांचे उंचीकरण करताना महापारेषणच्या वीजवाहिन्यांचे निर्धारित सुरक्षित अंतर कायम न ठेवल्यामुळे दुर्घटना किंवा अपघात घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी नाशिक महापालिकेची राहील, असेही महापारेषणने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सिंहस्थाच्या रस्ते विकासकामांमध्ये वीजसुरक्षेचे नियम पाळण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर निर्माण झाले आहे.
असा आहे नियम...!
वीजवाहिन्यांच्या सुरक्षेसाठी इंडियन इलेक्ट्रिसिटी ॲक्ट २००३, इंडियन टेलिग्राफ ॲक्ट १८८५ आणि केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या २०२३ मधील सुरक्षा नियमांनुसार सुरक्षित अंतर राखणे बंधनकारक आहे. त्यानुसार १३२ केव्ही वीजवाहिन्याच्या मध्यरेषेपासून दोन्ही बाजूंना १३.५ मीटर, तर २२० केव्ही वीजवाहिन्याच्या मध्यरेषेपासून दोन्ही बाजूंना १७.७ मीटर अंतरात नियमबाह्य उत्खनन अथवा बांधकाम करता येणार नाही. या नियमांचे काटेकोर पालन करण्याची आवश्यकता पत्रात अधोरेखित करण्यात आली आहे.