आसिफ सय्यद
नाशिक : राज्यात वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मोटार वाहनांची झपाट्याने वाढ गंभीर चिंता निर्माण करणारी ठरत आहे. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार, गेल्या वर्षभरात वाहनसंख्येत 8.2 टक्क्यांची वाढ होऊन ती 5 कोटी 28 लाख 49 हजार 560 वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे या वाढीत दुचाकी वाहनांचा सिंहाचा वाटा असून, सार्वजनिक परिवहनाच्या अपुर्या क्षमतेकडे ही आकडेवारी थेट बोट दाखवत आहे.
1 जानेवारी 2025 रोजी राज्यात 4 कोटी 88 लाख 25 हजार 70 वाहने होती. हीच संख्या वर्षभरात 40 लाखांहून अधिक वाहनांनी वाढून 1 जानेवारी 2026 रोजी 5 कोटींचा टप्पा ओलांडून 5.28 कोटींवर गेली. दुचाकी वाहनांमध्येच 23 लाख 74 हजार 620 इतकी भर पडली असून, सध्या त्यांची संख्या 3 कोटी 78 लाख 17 हजार 570 इतकी आहे. दुचाकी वाहनांचा हा वेगवान वाढता आकडा सार्वजनिक परिवहनाच्या कमकुवतपणाचे द्योतक मानला जात आहे. बस, रेल्वे यांसारख्या पर्यायांची मर्यादित उपलब्धता आणि वाढत्या शहरीकरणामुळे नागरिक खासगी वाहनांकडे वळत आहेत. चारचाकी वाहनांमध्येही मोठी वाढ दिसून येते. कार, जीप, टॅक्सी यांची संख्या 82 लाख 44 हजार 610 वर पोहोचली असून, वर्षभरात जवळपास 6 लाखांनी वाढ झाली आहे. कमी व्याजदरात सहज उपलब्ध होणार्या वाहन कर्जामुळे वाहन खरेदीकडे वाढता कल दिसून येत आहे.
ऑटो रिक्षांची संख्या 12 लाख 96 हजार 430 झाली असून, त्यात 73 हजार 590 ची वाढ नोंदवली गेली आहे. तसेच मालवाहतूक वाहनांमध्ये 24 टक्के आणि ट्रॅक्टरमध्ये 27.7 टक्के वाढ झाल्याने आर्थिक हालचालींना गती मिळाल्याचे संकेत मिळतात. राज्यात सध्या 29 लाख 92 हजार 930 मालवाहू वाहने, 15 लाख 93 हजार 470 ट्रॅक्टर, 2 लाख 1 हजार 260 प्रवासी बसेस, 26 हजार रुग्णवाहिका आणि 1 लाख 57 हजार इतर वाहने नोंदणीकृत आहेत. दर लाख लोकसंख्येमागे 41 हजार वाहने आणि दर किलोमीटर रस्त्यामागे 153 वाहनांचा ताण असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूणच, वाढती वाहनसंख्या ही पर्यावरण, आरोग्य आणि शहरी व्यवस्थापनासाठी मोठे आव्हान ठरत असून, दीर्घकालीन उपाय म्हणून सार्वजनिक परिवहन सक्षम करणे आणि पर्यावरणपूरक पर्यायांचा प्रसार करणे अत्यावश्यक बनले आहे.
राज्यात 9.27 लाख ई-वाहने
दरम्यान, इलेक्ट्रिक वाहनांचा वापरही वाढत असून डिसेंबर 2025 अखेर राज्यात 9 लाख 27 हजार 61 ई-वाहने नोंदली गेली आहेत. शासनाच्या धोरणामुळे या क्षेत्राला चालना मिळत असली तरी चार्जिंग सुविधांचा विस्तार आवश्यक ठरत आहे.
वाढते दडपण चिंतेचे
दर लाख लोकसंख्येमागे 41 हजार वाहने
दर कि.मी. रस्त्यामागे 153 वाहने
दर लाख लोकसंख्येमागे 20 रुग्णवाहिका
सार्वजनिक परिवहनावर अपुरा भर
प्रदूषण व वाहतूक कोंडीत वाढ
वाहनवाढीचे ठळक मुद्दे
एकूण वाहनसंख्या : 5.28 कोटी
वर्षभरातील वाढ : 40.24 लाख
दुचाकी वाहने : 3.78 कोटी
कार, जीप, टॅक्सी : 82.44 लाख
ऑटो रिक्षा : 12.96 लाख
मालवाहतूक वाहने : 29.92 लाख
ट्रॅक्टर : 15.93 लाख
इलेक्ट्रिक वाहने : 9.27 लाख