चांदवड (नाशिक) : तालुक्यातील राहूड माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाची बस पहिल्यांदाच उपलब्ध झाली. बस गावात येताच विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी बसचे औक्षण करत चालक, वाहकांचा सत्कार केला. दरम्यान, या बसमुळे तालुक्यातील सात ते आठ गावांच्या विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकर होणार असल्याने सर्वांनी महामंडळाचे आभार माले आहे.
पुण्यश्लोक देवी अहिल्या ग्रामविकास संचलित तालुक्यातील राहूड विद्यालयात इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत शाळा आहे. या विद्यालयात तालुक्यातील नांदूरटेक, शेडवस्ती, मैफत वस्ती, मांगीर बेट, राहूड परिसरातील विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना शाळेत येण्यासाठी बस उपलब्ध होत नसल्याने पायी प्रवास करावा लागत होता. या विद्यार्थ्यांची गैरसोय दूर व्हावी यासाठी पालकांनी माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्याकडे बस सुरू करण्याची मागणी केली. त्यानंतर कोतवाल यांनी मनमाड आगारप्रमुखांची भेट घेत विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. याची दखल घेत मनमाड आगारातून दुगाव मार्गे नांदूरटेक अशी नवीन बस सुरू करण्यात आली. ही बस सकाळी १०.३० व सायंकाळी ५ वाजता जाणार आहे. पर्यायाने शाळेतील विद्यार्थ्यांची प्रवासाची होणारी गैरसोय तूर्त दूर झाली आहे.
यावेळी रमेश पवार, वाल्मीक पवार, खंडू सोमवंशी, आनंदा पवार, नामदेव पवार, राजू निकम, रमेश सोमवंशी, प्रभाकर ठाकरे, गोरख शिंदे, राजाराम ठाकरे, गोरख ठोके, जगन आहिरे, समाधान पवार, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर ठाकरे, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका पवार, चंद्रकांत सूर्यवंशी आदींसह राहूड, नांदूरटेक शेडवस्तीवरील ग्रामस्थ उपस्थित होते.