Solar Pudhari
नाशिक

PM Surya Ghar Muft Bijli Yojana | प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत महाराष्ट्र अव्वल

PM Surya Ghar Muft Bijli Yojana | एका दिवसात 4,700 घरांवर बसविले सौर प्रकल्प; कंत्राटदार नोंदणीतही उल्लेखनीय

पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राने देशात उल्लेखनीय कामगिरी करीत अग्रस्थान पटकावले आहे. शुक्रवारी (दि. २९) देशभरात एका दिवसात विक्रमी १५ हजार घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले, त्यापैकी तब्बल ४,७०० प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्यात आल्यामुळे राज्य प्रथम क्रमांकावर राहिले.

घरगुती वीज ग्राहकांचे वीजबिल कमी करून स्वच्छ ऊर्जेला चालना देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली आहे. दि. २९ मे रोजी देशभरात एका दिवसात सर्वाधिक १५ हजार घरांवर छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले. त्यापैकी ४,७०० प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्यात आल्यामुळे राज्याने प्रथम क्रमांक मिळविला आहे.

या यशाबद्दल केंद्रीय नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांनी महाराष्ट्राचे अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणमार्फत या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, राज्याने ६ लाखांहून अधिक घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प बसविणाऱ्या राज्यांच्या गटात प्रवेश केला आहे.

मे महिन्यात योजनेसाठी प्राप्त अर्जाच्या संख्येत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर राहिला. तसेच प्रकल्प तपासणीमध्ये राज्याने अव्वल स्थान मिळविले असून, प्रकल्प उभारणी व कंत्राटदार नोंदणीमध्येही राज्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मे महिन्यात महाराष्ट्रात या योजनेसाठी ४ लाख ४९ हजार अर्ज प्राप्त झाले. त्यानंतर गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि केरळ या राज्यांचा क्रमांक लागतो.

छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीमध्ये महाराष्ट्राने ५४ हजार प्रकल्पांसह देशात दुसरे स्थान मिळविले असून, तपासणी झालेल्या ६९ हजार प्रकल्पांसह राज्य प्रथम क्रमांकावर आहे. राज्याच्या या यशाबद्दल अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

हरित ऊर्जेला चालना

या योजने अंतर्गत घरगुती ग्राहकांना सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी केंद्र शासनाकडून थेट अनुदान दिले जाते. एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॉटसाठी ६० हजार रुपये, तर तीन किलोवॉटसाठी ७८ हजार रुपये अनुदान उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांचा वीजखर्च कमी होण्यासोबतच हरित ऊर्जेला चालना मिळत आहे.

महाराष्ट्राची ठळक कामगिरी

मे महिन्यात ४.४९ लाख अर्जासह देशात प्रथम क्रमांक ५४ हजार सौर प्रकल्प उभारणीत देशात दुसरे स्थान ६९ हजार प्रकल्प तपासणीत देशात अव्वल ४१३ नोंदणीकृत कंत्राटदारांसह दुसरे स्थान एका दिवसात ४,७०० घरांवर सौर प्रकल्प उभारण्याचा विक्रम ६ लाखांहून अधिक घरांवर सौरऊर्जा प्रकल्प बसविणाऱ्या राज्यांच्या गटात समावेश

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT