नाशिक : पोलिस साहित्य संमेलनात बोलताना बाळासाहेब पाटील. व्यासपीठावर बी. जी शेखर पाटील, शिरीष सहस्रबुद्धे आदी. Pudhari News Network
नाशिक

Maharashtra Police Literature Conference : खाकी वर्दी नागरिकांचे, तर लेखणी मनाचे रक्षण करते

Nashik News | ग्रामीण पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील : महाराष्ट्र पोलिस साहित्य संमेलनाचे सूप वाजले

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी सदैव नारिकांच्या रक्षणासाठी तत्पर राहात सेवा देत असतात. हाच पोलिस लेखक होतो, तेव्हा त्याच्यातील संवेदनशील अभिव्यक्ती बाहेर येते. खाकी वर्दी, नागरिकांचे रक्षण करते, तर लेखणी मनाचे रक्षण करते, असे उद्गार नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी काढले.

गंगापूर रोडवरील मुक्त विद्यापीठ परिसरात सुरू असलेल्या द्विदिवसीय महाराष्ट्र पोलिस साहित्य संमेलनाचे रविवारी (दि. २५) सूप वाजले. त्या समाराेप समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, स्वागताध्यक्ष बी. जी. शेखर पाटील, शिरीष सहस्रबुद्धे, डॉ. कैलास कमोद उपस्थित हाेते.

डॉ. कराळे म्हणाले की, संमेलने पोलिस दलातील साहित्यिकांसाठी तणावमुक्ती व ऊर्जेसाठी गरजेची आहेत. पोलिस दलातील साहित्यिकांसाठी या संमेलनामधून मोठे आणि सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. त्यांनी सेवा सांभाळून केलेले लिखाण अत्यंंत कौतुकास्पद आहे.

संमेलन यशस्वीतेसाठी संजय करंजकर, प्रा. सोमनाथ मुठाळ, डॉ. सीताराम कोल्हे, जी. पी. खैरनार, किरण सोनार आदींनी परिश्रम घेतले. अभय पै, डॉ. राजेंद्र राठोड, जयश्री वाघ यांनी सूत्रसंचालन केले.

संमेलनात संमत झालेले ठराव

  • पोलिस साहित्य संमेलनासाठी राजकीय निधीची तरतूद व्हावी

  • पुढील साहित्य संमेलन पुणे येथे आयोजित केले जाईल

  • संमेलनासाठी पोलिस साहित्यिकांना ३ दिवसांची विशेष पगारी रजा मंजूर व्हावी

  • पाेलिस अधिकाऱ्यांसमवेत पत्नी, मुलगा / मुलगी यांचाही संमेलनात समावेश व्हावा

  • कलाकार, अभिनेते - अभिनेत्री, गायकांसाठी शासकीय सवलत देण्यात यावी.

परिसंवाद, कविसंमेलन

दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र पोलिस दलातील कवींचे खुले कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. नंतर 'पोलिस साहित्य संमेलन काळाची गरज' या विषयावरील परिसंवादात किरणकुमार चव्हाण, डॉ. रोहिदास दुसार आणि प्राची मुळीक सहभागी झाले होते. गजल कार्यक्रमालाही उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT