नाशिक : विकास गामणे
महाराष्ट्र विधान परिषदेला परंपरेने 'ज्येष्ठांचे सभागृह' म्हणून ओळखले जाते. ज्या ठिकाणी प्रदीर्घ राजकीय, सामाजिक किंवा प्रशासकीय अनुभव असलेले, साधारणपणे ६० ते ७० वयोगटातील ज्येष्ठ नेते राज्याला दिशा देण्याचे काम करतात, असा आजवरचा आपला अनुभव आहे. मात्र, आता या सभागृहाचे चित्र लक्षणीयरीत्या बदलत आहे. गेल्या काही निवडणुकांचे आणि नुकत्याच झालेल्या फेरबदलांचे निरीक्षण केले असता, विधान परिषद आता 'तरुण' होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
चाळिशी आणि पन्नाशीतील तरुण, अभ्यासू चेहऱ्यांनी आता सभागृहात आपला ठसा उमटवण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी विधान परिषदेत ५५ ते ६५ वयोगटातील किंवा त्याहून अधिक वय असलेल्या नेत्यांची संख्याच अधिक असायची. अनुभवाची शिदोरी घेऊन आलेल्या ज्येष्ठ मंडळींमुळे या सभागृहाला एक वेगळे गांभीर्य असायचे. मात्र, बदलत्या राजकीय समीकरणांमुळे आणि पक्षांनी तरुणांना दिलेल्या संधीमुळे सध्या विधान परिषदेत ४५ ते ५० वर्षे वयाच्या आसपास असणाऱ्या आमदारांचे प्रमाण वाढले आहे.
सध्याच्या सभागृहाचा विचार केल्यास, भाजपच्या पंकजा मुंडे (४६), प्रज्ञा सातव (५०), परिणय फुके (४५), अमित गोरखे (४४), योगेश टिळेकर (४८) आणि काँग्रेसचे सतेज (बंटी) पाटील (५४), धीरज लिंगाडे (४८) यांच्यासारखे पन्नाशीच्या आत किंवा पन्नाशीच्या सुरुवातीला असलेले अनेक नेते सभागृहात सक्रियपणे काम करत आहेत. हे सर्व नेते तरुण ऊर्जेसह लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात जनसामान्यांचे प्रश्न मांडत आहेत.
थेट अन् अभ्यासपूर्ण प्रश्नांवर देतायेत भर
यावेळच्या विधान परिषद रचनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे वय वर्षे ४० ते ४५ च्या दरम्यान असलेल्या तरुण नेत्यांची झालेली धडाकेबाज एन्ट्री आहे. केवळ राजकीय वारसा म्हणून नव्हे, तर स्वतःचे नेतृत्व सिद्ध करून हे तरुण आमदार 'ज्येष्ठांच्या सभागृहात' पोहोचले आहेत. त्यांच्या येण्याने सभागृहातील चर्चेचा स्तर आणि ऊर्जा दोन्ही बदलले आहे. हे तरुण आमदार केवळ बाकांवर बसून राहणारे नसून, ऐन कामकाजाच्या वेळी मंत्र्यांना थेट आणि अभ्यासपूर्ण प्रश्न विचारून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्येष्ठ नेत्यांच्या प्रदीर्घ अनुभवाला या तरुण रक्ताच्या आधुनिक दृष्टिकोनाची जोड मिळाल्याने, महाराष्ट्राच्या विकासाच्या धोरणांना एक नवी गती आणि दिशा मिळत आहे, हे मात्र नक्की
बदलत्या प्रवाहाचे संकेत
रामराजे नाईक निंबाळकर (७८), एकनाथ खडसे (७३), डॉ. नीलम गो-हे (७१) यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन सभागृहाला लाभत असतानाच, नव्या दमाच्या तरुण आमदारांची संख्या वाढणे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील बदलाचे संकेत मानले जात आहेत.